As Vikhe Patil left, Amarsinh Pandit rushed to meet girish Mahajan | Sarkarnama

विखे पाटील जाताच अमरसिंह पंडित गिरीश महाजन यांना भेटले

दत्ता देशमुख
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मराठवाड्याच्या हक्काचे सात टिमएमसी पाणी सोडण्याबाबत बैठकीनंतर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचा शासनावर दबाव वाढल्याने पाणी सोडण्यास विलंब होत आहे. 

-अमरसिंह पंडित

बीड : नाशिक आणि नगर जिल्ह्यातील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी पाणी वरिल धरणांतील पाणी मराठवाड्यातील धरणात सोडण्यासाठी शासन विलंब करत आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणी अमरसिंह पंडित यांनी केली.

याबबत श्री. पंडित यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील महाजन यांची भेट घेऊन जात असतानाच पंडित त्यांच्या दालनात गेले. 

राजकारणात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस अशी  युती असली तरी गोदावरीच्या पाण्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील आणि अमरसिंह पंडित यांच्या भूमिका एकमेकांच्या विरोधात आहे . 

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५ मधील तरतुदीनुसार दिनांक १५ ऑक्टोबर पूर्वी उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडीमध्ये पाणी सोडणे अपेक्षित आहे. पाणी सोडण्याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर नाशिक, नगर जिल्ह्यातील नेत्यांचा शासनावर दबाव वाढल्यानंतर याबाबत अमरसिंह पंडित यांनीही भूमिका घेतली आहे. 

मराठवाड्यात दुष्काळाची तिव्रता वाढत असून पाणीटंचाई परिस्थिती गंभीर होत आहे. या पार्श्‍वभुमीवर गोदावरी नदीकाठच्या लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गोदावरी नदीपात्रातील आपेगाव, हिरडपूरी, शहागड, गोंदी, जोगलादेवी, मंगरुळ, शिवनगाव, ढालेगाव, लोणीसांगवी या बॅरेज आणि बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. या बाबत दसऱ्यानंतर निर्णय घेणार असल्याचे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्र्यांना भेटून जात असतानाच अमरसिंह पंडित जलसंपदा मंत्र्यांकडे गेले.

संबंधित लेख