मुंबई पोलिसांच्या नजर कैदेतील शेतकरी सांगली पोलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांच्या नजर कैदेतील शेतकरी सांगली पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्ज यावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर अस्थि कलश यात्रा घेवून आलेला सांगलीचा शेतकरी विजय बाळासाहेब जाधव गेल्या तीन दिवसापासून मुंबई पोलिसांच्या नजर कैदेत होता.

त्याला घेवून जाण्यासाठी सांगलीचे पोलिस मंगळवारी सकाळीच आझाद मैदानावर दाखल झाले असून रात्री सांगली पोलिस विजय जाधवला गावी घेवून जाणार आहेत. अस्थी कलश दर्शन यात्रा मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर घेऊन जाण्याचे विजय जाधवचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले आहे. 

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील साखराळे गावचा विजय जाधव हा शेतकरी "अस्थी कलश दर्शन' यात्रेमुळे राज्यात चांगलाच चर्चेला आला आहे. वडिलोपार्जित अवघी 30 गुंठे जमीन. दोन भाऊ. यामुळे वाटणीला आलेल्या अवघ्या 10 गुंठे मालकीचा विजय जाधव शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जे व आत्महत्या या विषयावर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. 

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणे, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करणे, शेतीमालावरील निर्यात बंदी उठविणे, आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी सरकारने घ्यावी या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 6 मेपासून "अस्थी कलश दर्शन' यात्रा करत कोल्हापूर ते मुंबई सायकलवर फिरत आहे. 4 मे रोजी कोल्हापुरातील कोडोली गावच्या विलास यशवंत शितापे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. यामुळे शेतकरी आत्महत्येकडे राज्य सरकारचे "अस्थी कलश दर्शन' यात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा विजय जाधवने निर्धार केला.

आत्महत्या केलेल्या विलास शितापेच्या अस्थी घेऊन ही यात्रा सुरू झाली. या अस्थियात्रेत विलास शितापेसह महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या आत्महत्या केलेल्या 24 शेतकऱ्यांच्याही अस्थी त्याने समाविष्ट केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अस्थिमध्ये कोल्हापुरातील 2, सांगलीतील 3, साताऱ्यातील 1, सोलापुरातील 2, परभणीतील 1, यवतमाळच्या 4, वर्ध्यातील 1, नागपुरातील 2, अमरावतीमधील 3, नाशिकमधील 3 व सभोवतालच्या गावातील 3 शेतकऱ्यांच्या अस्थीच यात समावेश आहे. 

कोल्हापूर ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा प्रवास करत 6 मे रोजी सुरू झालेली "अस्थी कलश दर्शन' यात्रा मुंबईतील आझाद मैदानावर 20 मे रोजी सांयकाळी पोहोचली. ही यात्रा मुंबईत वर्षा येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन जाणार असल्याचा इशारा विजय जाधवने यापूर्वीच दिल्याने मुंबई पोलिसांचे "अस्थी कलश दर्शन' यात्रेवर बारीक लक्ष होते. या यात्रेदरम्यान विजय जाधवची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची अकोला, नाशिक या दोन ठिकाणी भेट झाली. याशिवाय शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, आ. अमित देशमुख, आ. बोंद्रे यांच्यासह अन्य आमदारांच्या भेटी झाल्या. त्यांना या यात्रेची पार्श्‍वभूमी विलास जाधवने सांगितली. 

शनिवारी, 20 मे रोजी ही "अस्थी कलश दर्शन'यात्रा आझाद मैदानावर आली असता, मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी शेतकरी विजय जाधवला ताब्यात घेतले. चौकशीनंतर विलास जाधवला पोलिसांनी सोडले असले तरी त्यानंतर आत्तापर्यंत विजय जाधवला मुंबई पोलिसांनी "नजर कैदे'तच ठेवले असल्याचे विजय जाधव यांनी सांगितले.

मुंबईत सुरू असलेले जीसएसटीचे विशेष अधिवेशन यामुळे वर्षा बंगल्यावर ही "अस्थी कलश दर्शन' यात्रा जाऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये याकरिता विलास जाधववर मुंबई पोलिस सतत लक्ष ठेवून होते. विजय जाधवला घेऊन जाण्यासाठी सांगलीचे पोलिस सकाळीच आझाद मैदानावर दाखल झाले असून आज रात्रीच सांगली पोलिस विलास जाधवसह त्याच्या "अस्थी कलश दर्शन' यात्रेलाही सांगलीला घेऊन जाणार आहेत. 

दोन दिवसानंतर या अस्थींचे सांगलीत विधिवत विसर्जन करून 1 जूनपासून होत असलेल्या शेतकरी संपाबाबतच्या जनजागृती मोहिमेत आपण सहभागी होणार असल्याचे शेतकरी विजय जाधव यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com