Vidharbha ZP election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

विदर्भात स्थानिक नेत्यांची सोय वरचढ 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 मार्च 2017

सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी मुंबईहून दिलेल्या आदेशांची तालीम न करता स्थानिक नेत्यांनी सोय पाहून राजकीय पक्षांशी सोयरीक केल्याचे विदर्भातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीने स्पष्ट झाले. 

नागपूर  : सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी मुंबईहून दिलेल्या आदेशांची तालीम न करता स्थानिक नेत्यांनी सोय पाहून राजकीय पक्षांशी सोयरीक केल्याचे विदर्भातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीने स्पष्ट झाले. 

विदर्भातील सहा जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात आघाडी करावी, असे ठरविले होते. यासंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे भाजपला दूर ठेवण्यासाठी वेळ पडल्यास सेनेशी आघाडी करावी, असेही सुचविण्यात आले होते. शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला वगळून युती करावी, असे आदेश दिले होते. या आदेशांची अंमलबजावणी विदर्भात झालेली दिसून येत नाही. 

वर्धा व चंद्रपूरमध्ये भाजपला तर अमरावती जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेसला बहुमत आहे. यामुळे या जिल्हा परिषदांमध्ये आघाडीची फारसी अडचण नव्हती. परंतु गडचिरोली, यवतमाळ व बुलडाणा जिल्हा परिषदांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने आघाडीशिवाय पर्याय नव्हता. यवतमाळमध्ये तर कॉंग्रेसने भाजपशी सोयरीक करून सर्वांना "चक्रम' बनविले. सोमवारी सायंकाळपर्यंत सेना नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर नाईक व माजी आमदार संदीप बाजोरीया यांना सेनेला बाय बाय करून भाजपची छावणी गाठली. यात कॉंग्रेसच्या गळ्यात अनायासे अध्यक्षपदाची माळ पडली. 

गडचिरोलीत भाजपच्या नेत्यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीष राजे आत्राम यांना बाजूला ठेवून आदिवासी विद्यार्थी आघाडीचे दीपक आत्राम यांच्यासोबत आघाडी करून सत्ता काबीज केली. बुलडाणा येथे भाजपने सेनेला दूर ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसची जवळीक साधली. यावरून स्थानिक नेत्यांनी आपापल्या सोईने निर्णय घेत आघाडी केल्याचे स्पष्ट झाले. 

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष 
वर्धा- अध्यक्ष- नितीन मडावी (भाजप) 
उपाध्यक्ष- कांचन नंदुरकर (भाजप) 
चंद्रपूर- अध्यक्ष- देवराव भोंगळे- (भाजप) 
उपाध्यक्ष- कृष्णा सहारे- (भाजप) 
बुलडाणा- अध्यक्ष- उमा तायडे- (भाजप) 
उपाध्यक्ष- मंगला रायपुरे (राष्ट्रवादी) 
यवतमाळ- अध्यक्ष- माधुरी आडे (कॉंग्रेस) 
उपाध्यक्ष- श्‍याम जयस्वाल (भाजप) 
गडचिरोली- अध्यक्ष- योगिता भांडेकर (भाजप) 
उपाध्यक्ष- अजय कंकडालवार (आदिवासी विद्यार्थी संघटना) 
अमरावती- अध्यक्ष- नितीन गोंडाणे (कॉंग्रेस) 
उपाध्यक्ष- दत्ता ढोमणे (शिवसेना) 

संबंधित लेख