vegeterian mla | Sarkarnama

शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह तीन आमदार "शाकाहारी'! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री व कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई आणि वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी मात्र, श्रावण पाळलेला नाही. त्यांच्या घरात श्रावण पाळला जातो पण, कार्यकर्त्यांचा संपर्क, मतदारसंघ दौरा, अधिवेशन आणि मंत्री मंडळाची बैठक या धावपळीच्या शेड्युलमध्ये त्यांना पुढे येईल, चांगले असेल ते खाणे याकडे भर राहतो. 

सातारा : एरव्ही पक्षाच्या बैठका, अधिवेशन आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव होणाऱ्या जेवणावळींमुळे मांसाहाराचा होणारा अतिरेक आमदारांच्या फिटनेसला त्रासदायक ठरतो. हा अतिरेक टाळण्यासाठी का होईना श्रावण महिन्याचे अध्यात्मिक महत्व सांगत जिल्ह्यातील आमदारही महिन्यापुरते शाकाहारी होण्याची संधी सोडत नाहीत. त्याचपद्धतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील हे शाकाहारी झाले आहेत. 

फिटनेससाठी शाकाहार उत्तम असे आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे आणि रोगराईला निमंत्रण देणाऱ्या पावसाळी वातावरणाचा फटका प्रकृतीला बसू नये म्हणून आमदारही या महिन्यात आपली आणि कुटुंबियांची काळजी घेतात. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा, कॉंग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. यापैकी कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे पूर्ण शाकाहारी आहेत. तर कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे हे गेल्या दहा वर्षांपासून शाकाहारी झाले आहेत. त्यामुळे श्रावण काय की अन्य कुठलाही महिना हे तिघे पूर्ण शाकाहारीच आहे. तर श्रावणानिमित्त शाकाहारी झालेल्यांमध्ये साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, कॉंग्रेसचे विधान परिषदेचे आनंदराव पाटील यांचा समावेश आहे. 

 

संबंधित लेख