‘वंचित’कडून काँग्रेससोबत आघाडीबाबत चाचपणी 

लोकसभा निवडणुकीत एकही खासदार निवडून आला नसला तरी वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांचा टक्का हा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निश्‍चितच उत्साह वाढविणारा आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी इच्छुकांच्या चाचपणीसह आघाडीबाबतच्या निर्णयाकरिता स्थानिक पताळीवरील पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
‘वंचित’कडून काँग्रेससोबत आघाडीबाबत चाचपणी 

अकोला : लोकसभा निवडणुकीत एकही खासदार निवडून आला नसला तरी वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांचा टक्का हा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निश्‍चितच उत्साह वाढविणारा आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी इच्छुकांच्या चाचपणीसह आघाडीबाबतच्या निर्णयाकरिता स्थानिक पताळीवरील पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

अमरावती येथे रविवारी (ता.१६) झालेल्या विभागीय आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये काँग्रेससोबत सन्मानजनक आघाडीचा सूर उमटला तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसपासून लांब राण्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहूजन आघाडीने विधानसभेची तयारी अधिक सावधपणे सुरू केली आहे. गत महिन्यातच कोल्हापूर येथे राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर जिल्हास्तरावर आढावा बैठकीतून पुढील वाटचालीबाबतची रुपरेषा जाणून घेण्याचे प्रयत्न झाले. 

आता विभागीय स्तरावर आढावांचे सत्र वंचित बहुजन आघाडीने सुरू केले आहे. रविवारी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व महासचिवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

अकोला जिल्ह्यातून या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव दीपक गवई आणि ज्ञानेश्‍वर सुलताने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील अपयशाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय कुठे चुका झाल्यात याबाबतही माहिती घेण्यात आली. 

येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणती काळजी घेतली पाहिजे? जिल्हास्तरावर विधानसभा निवडणुकीची तयारी काय? इच्छुकांकडून संपर्क साधण्यात आले काय? कोणत्या पक्षासोबत आघाडी केली पाहिजे? आदी विषयावर चर्चा करून संभाव्य आघाडीबाबत चाचपणी करण्यात आल्याची माहिती आहे. 

विधानसभेसाठीच्या इच्छुकांचे अर्ज जिल्हाध्यक्षांकडे 
विधासभा निवडणुकीसाठी वंचित आघाडीकडून इच्छुक असलेल्यांचे अर्ज जिल्हाध्यक्षांनी स्वीकारावे, असा निर्णय विभागीय बैठकीत झाल्याची माहिती आहे. 

अमरावती येथे वंचित आघाडीची विभागीय बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील अपयशावर चर्चा करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षांनी माहिती घेतली. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याची माहिती जाणून घेण्यात आली. 
-प्रदीप वानखडे, जिल्हाध्यक्ष, भारिप-बमसं, अकोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com