Vasundhara Raje accepts defeat with sportsman spirit | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पीयूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रिपदाचीही जबाबदारी, हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता

पराभव खिलाडूपणे स्वीकारणाऱ्या बिनधास्त वसुंधरा राजे  

सरकारनामा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

जीवनात हार-जीत चालत असते. पराभव सुध्दा खिलाडूपणे कसा स्वीकारायचा याचे उदाहरणच वसुंधरा राजे यांनी दाखवून दिले. 
  

नवी दिल्ली :  शिवराजसिंग चौहान, रमणसिंग हे पराभवाने नाराज, दुःखी आहेत. परंतु राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या मात्र एकदम बिनधास्त आहेत. पराभवानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची भावना नाही. 

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या शपथविधीच्या वेळी वसुंधरा राजे यांनी खिलाडूपणा कायम राखला. या समारंभाला उपस्थित सर्व कॉंग्रेसनेत्यांशी त्यांनी या भावनेचा परिचय देऊन दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांचे भाचे ज्योतिरादित्य यांना त्यांनी जवळ घेतले. 

राहूल गांधी यांनीही तशाच खिलाडूपणाने व त्यांच्या वयाचा मान राखून वसुंधरा राजे यांच्या आसनापाशी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात वसुंधरा राजे यांनी थेट दिल्लीवर स्वारी केली. 
त्या चक्क संसदेत आल्या. त्या आलेल्या पाहिल्यानंतर राजस्थानचे सर्व भाजप खासदारही त्यांच्याभोवती गोळा झाले. 

त्यांनी संसदेत येऊन मध्यकक्षात चक्क दोन ते तीन तास दरबार लावला.  केवळ भाजपचेच नव्हे तर कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांचे खासदारही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसले. कॉफी, टोस्ट यांचा नियमित पुरवठा चालू राहिला आणि मग गप्पांची मैफल न जमली तरच नवल ! 

जीवनात हार-जीत चालत असते. पराभव सुध्दा खिलाडूपणे कसा स्वीकारायचा याचे उदाहरणच वसुंधरा राजे यांनी दाखवून दिले. 
  

संबंधित लेख