Vashim District Shivsena Politics | Sarkarnama

वाशिम जिल्ह्याच्या शिवसेनेचा वाद 'मातोश्री' वर

राम चौधरी
शनिवार, 29 जुलै 2017

जिल्ह्याच्या शिवसेनेत भावना गवळींचा शब्द प्रमाण मानला जात होता. इतर पक्षात होणारी फंदफितूरी शिवसेनेत नावालाही दिसत नव्हती. मात्र, गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्याच्या शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र समोर येत आहे. यामध्ये खासदार भावना गवळी समर्थक तर दुसरीकडे शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांचे समर्थक अशी सरळ विभागणी झाली आहे.

वाशीम : जिल्ह्याच्या राजकारणावर एकछत्री अंमल निर्माण करणाऱ्या शिवसेनेत सध्या पक्षातंर्गत कुरघोडीचे राजकारण उफाडून आले आहे. खासदार भावना गवळी आणि पालकमंत्री संजय राठोड गटात दुफळी निर्माण झाल्याने हा वाद आता थेट 'मातोश्री' पर्यंत पोहोचला आहे.  

पश्चिम विदर्भाच्या राजकारणात वाशिम जिल्हा शिवसेनेचा गड म्हणून समजला जातो. जिल्ह्यामध्ये शिवसेनेला जनाधार मिळवून देण्यासाठी माजी खासदार पुंडलीकराव गवळी, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, केशवराव चव्हाण, झिंगराजी महाले या कडव्या शिवसैनिकांनी जीवाचे रान करीत गाव तेथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक तयार केले होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता असतांना या कठिण काळात या शिवसैनिकांना पक्षाला जनतेच्या मनात स्थान मिळविण्यात यश आले. परिणामी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना पराभुत करून शिवसेनेचा जिल्ह्यातील पहिला लोकप्रतिनिधी म्हणून पुंडलीकराव गवळी संसदेत पोचले.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाडी अचूक ओळखून प्रसंगी कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या पुंडलीकराव गवळी यांच्या राजकारणाचा वारसा त्याच्या कन्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी समर्थपणे पेलला. या जनसंपर्काच्या जोरावरच खासदार भावना गवळी यांनी 1999 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचे दिग्गज नेते अनंतराव देशमुख यांचा पराभव केला. 2004 च्या निवडणूकीत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे वजनदार मंत्री मनोहर नाईक यांचा पराभव केला. 2009 मध्ये काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा पराभव करून खासदार गवळींनी विजयाची 'हॅटट्रीक' साधली. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचे वजनदार मंत्री शिवाजीराव मोघे यांना पराभूत करून खासदार गवळी यांनी संसद गाठली.

या वीस वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या शिवसेनेत भावना गवळींचा शब्द प्रमाण मानला जात होता. इतर पक्षात होणारी फंदफितूरी शिवसेनेत नावालाही दिसत नव्हती. मात्र, गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्याच्या शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र समोर येत आहे. यामध्ये खासदार भावना गवळी समर्थक तर दुसरीकडे शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांचे समर्थक अशी सरळ विभागणी झाली आहे. मात्र, खासदार भावना गवळी यांची पक्षसंघटनेवरील पकड व यांचा जनसंपर्क हिच त्यांची जमेची बाजू असल्याने विरोधी गट जिल्ह्यात एल्गाराची भानगड करण्यापेक्षा 'मातोश्री' वर आपली कैफीयत मांडत असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या वाट्याला कधी नव्हे ते जिल्ह्याचे पालकत्व मिळाले आहे. या काळामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामे होतील, अशी आशा असताना अचानक आलेले बंडाळीचे वादळ सच्चा शिवसैनिकांना मात्र अस्वस्थ करीत आहे.

कारंजा मतदार संघ ठरतोय वादाचे कारण
कारंजा विधानसभा मतदार संघात कधीकाळी निर्विवाद वर्चस्व गाजविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश डहाके यांचा शिवसेनेतील प्रवेश बंडाळीचे कारण असल्याची चर्चा आहे. प्रकाश डहाके शिवसेनेत आल्यानंतर आपल्या प्रभावातील व्यक्तीला विधानसभेच्या उमेदवारीपासून मुकावे लागेल. हा हेतू असल्याने ही बंडाळी उद्भवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रकाश डहाके यांचा वैयक्तीक जनसंपर्क आणि शिवसेनेची मते याचा मेळ घालत अनेकांच्या इच्छा आकांक्षाला लगाम बसण्याचे चित्र असल्याने त्यांनीच शिवसेनेतील असंतुष्टांना हाताशी धरून खासदार गवळींच्या विरोधात बंडाळीचे शस्त्र उपसल्याची चर्चा आहे.

संबंधित लेख