आंबेडकरांच्या उपस्थितीत धडाडल्या वंचित आघाडीच्या तोफा

येणाऱ्या निवडणूकीत सत्ता परिवर्तन घडवून ऍड. प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करायचे असा निर्धार बहुतेक नेत्यांनी व्यक्त केला.
आंबेडकरांच्या उपस्थितीत धडाडल्या वंचित आघाडीच्या तोफा

कोल्हापूर :    "चहा विकत होतो असे श्री. मोदी सांगतात कुठे विकत होते, कोणास ठाऊक चहावाल्यांकडे सोन्यांचा कोट कसा आला प्रश्‍न आहे," अशा शब्दात  माजी आमदार लक्ष्मण माने यांनी मोदींवर टिका केली. 

कोल्हापुरात मंगळवारी सत्ता संपादन मेळाव्यात बहुजन चळवळीतील नेत्यांनी प्रकाश आंबेडकर  यांच्या उपस्थितीत बुलंद मते मांडली. येणाऱ्या निवडणूकीत सत्ता परिवर्तन घडवून ऍड. प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करायचे असा निर्धार बहुतेक नेत्यांनी व्यक्त केला. मोदी सरकार व कॉंग्रेस पक्षाच्या  नेत्यांवर  वक्त्यांनी आक्रमक  टिका या सभेत केली. 

लक्ष्मण माने  यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, " श्री. मोदी लोकांशी, माध्यमांशी बोलत नाही ते मन की बात करतात पण आमचे पण कधीतरी ऐका की मोदी. त्यांच्या नोटा बंदींचा सर्वात मोठा फटका बसला, 73 टक्के संपत्तीचा वाटा केवळ शंभर दिडशे लोकांकडे आहे, उर्वरीत 23 टक्के संपत्तीचा वाटा उर्वरीत कोट्यावधी जनतेकडे आहे. संपत्तीचा वाटा त्यांनी अंबानींना दिला जो शिल्लक तो आपल्या हाती ठेवला ."

वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. आण्णाराव पाटील म्हणाले की, " पैशाच्या बळावर सत्ता संपादन होऊ देणार नाही विलासराव देशमुख व गोपिनाथ मुंडे यांनी मतांचा पाच हजारांचा दर दहा हजारावर नेऊन ठेवला.  हे पैस तुमच्या आमच्या खिशातून आलेले होते. आम्ही तसे करणार नाही आम्ही मतदाराना स्वाभिमान देणार आहोत. हिंमत्त असेल तर मैदानात उतरावे.''

धनगर समाजाचे अध्यक्ष जयसिंगराव शेंडगे म्हणाले की, " यापूर्वीच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी ग्रामीण भागाचा विकास केला नाही शहरात मेट्रोसारखे प्रकल्प आणण्यासाठी कोट्यावधींचा निधी देतात मात्र ग्रामीण भागात दुष्काळामुळे जनावरे तडफडत आहेत. त्यांना चारा देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगतात असा प्रत्येक गोष्टीत सरकारने दुट्टप्पीपणा केला आहे. असे सरकार बदलण्याची गरज आहे.''

भटके विमुक्तांचे नेते किसन चव्हाण म्हणाले की, " राजर्षी शाहू महाराजांचा वारसा सांगणारे मात्र भाजपच्या गोटात  गेले. दलित नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सगळे कॉंग्रेसमधील पाटीलच आले आहेत. आता पर्यंत प्रत्येकांनी आमची फसवणूक केली म्हणून आम्ही आमचे नेते म्हणून प्रकाश आंबेडकरांना निवडले आहे. आमची सत्ता येताच त्यांनाच मुख्यमंत्री करू''

नाभिक समाज नेते गोविंद दळवी म्हणाले, " नाभिक समाजाकडे कॉंग्रेस भाजप आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे, आता ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने नेतृत्व मिळाले आहे.''

"कोण हे फडतूस इंगवले, त्यांनी आम्हाला धमकी देऊ नये .  आम्हाला शीव  ओलांडू देणार नाही, म्हणतात शीव  कुठे आहे हे तरी त्यांना माहित आहे?  काय असली कोल्हे कुई आता थांबावा ,"अशा शब्दात प्रा. सुकुमार कांबळे यांनी शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांच्या इशाऱ्याला उत्तर दिले.

प्रा. शाहीद शेख म्हणाले की, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुस्लीमांनी साथ दिली होती. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना अखेरच्या श्‍वास पर्यंत साथ देणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगून आजवर आम्हाला धकमकावले गेले मात्र महाराजांच्या मंत्री मंडळात जबाबदार पदावर मुस्लीम व्यक्ती होत्या हे सांगितले जात नाही छत्रपती शिवाजीराजे आपल्या सर्वांच आहेत. आम्हाला इथून कोणी हूसकावून शकणार नाही.'' 
 

निर्मिती विचार मंचचे अनिल म्हमाणे, इंद्रजीत कांबळे, अस्लम मुल्ला , प्रिया कांबळे, अशोक सोनवणे आदीनी संयोजन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com