Vajpayee was great because of his thoughts and acts : Ashok Chavan | Sarkarnama

वाजपेयी पदानेच नव्हे तर विचाराने-आचरणाने मोठे होते : अशोक चव्हाण 

सरकारनामा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नांदेड येथे शुक्रवारी अटल  बिहारी वाजपेयी यांना  सर्वपक्षीय शोकसभेमध्ये  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . 

नांदेड :  आजवरच्या देशाच्या राजकारणामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचासारखा नेता झालेला नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीकडे पाहणारा नेता म्हणजे अटलजी. ‘त्यांच्या मनात ते ओठांत होते आणि जे ओठांत ते विचारांत होते’ म्हणूनच त्यांचे स्थान हे प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्यांचे राजकारण, समाजकारणातील गुण आज प्रत्येक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतले पाहिजेत.

अर्थातच त्यांनी राजकारण्यांना दिलेला ‘राजधर्म विसरता कामा नये’ हा कानमंत्र जोपासावा, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. एकंदरीतच सर्वांना दिशा देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेल्याच्या भावना विविध पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी कुसुम सभागृहामध्ये व्यक्त केल्या.

यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री आमदार डी. पी. सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे, माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर, माजी खासदार डी. बी. पाटील, डॉ. धनाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, गजानन घुगे, हरिहरराव भोसीकर, सुरेश गायकवाड, यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी सायकल, रिक्षा, बस, रेल्वेने प्रवास करून प्रचार केला. पक्ष वाढवला, मग पंतप्रधानपद भूषविले. देशातला माणूस सुधारला पाहिजे, देश घडला पाहिजे यासाठीच त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे कार्य आत्मसात करून आपणही वाटचाल करू, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले आहे. ते पदानेच नव्हे; तर विचाराने, आचरणाने मोठे होते. त्यामुळेच सर्व पक्षांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. शंकरराव चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते उपस्थित होते. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन वाटचाल करु या.

माजी मंत्री डॉ. किन्हाळकर म्हणाले की, पक्षाच्या भिंतीपलीकडे जाऊन त्यांनी कार्य केले आहे. देशाची प्रगती साधावयाची असेल तर वाजपेयी यांच्यासारखेच समाजमनामध्ये स्थान निर्माण करावे लागणार आहे.

कॉंग्रेसचे आमदार डी. पी. सावंत म्हणाले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीकडे बघणारे अटलजी होते. त्यांचा ‘राजधर्म विसरता कामा नये’ हा कानमंत्र आपण सर्वजण राजकारण बाजूला ठेवून जोपासू या. 

भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर म्हणाले की, वाजपेयी आपल्यातून गेलेले असले तरी, त्यांचे विचार, राजकीय कौशल्य, त्यांच्या कविता आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यांच्या जाण्याने पितृतुल्य नेतृत्त्व हरवले आहे.

शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे म्हणाले की, वाजपेयी अष्टपैलू नेतृत्त्व होते. कवी, लेखक, संपादक, पत्रकार, लोकनेता अशा विविध पदांवर काम करून त्यांनी न्याय दिला. निष्कलंक नेता आपल्यातून गेल्याचे दुःख झाले.
 

संबंधित लेख