Vajpayee travelled by train & ate party worker's tifeen to grow party base | Sarkarnama

कार्यकर्त्याच्या घरचा डबा आणि रेल्वेने प्रवास करीत वाजपेयींनी केला पक्ष विस्तार 

गणेश पांडे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

परभणीकरांना वाजपेयींसारख्या मोठ्या नेत्याने हॉटेल ऐवेजी सामान्य कार्यकर्त्याच्या घरचा डबा रेल्वेत खाल्ला असल्याची आठवण आजही आहे .

परभणी :आजकालचे नेते हेलिकॉप्टरशिवाय हिंडत नाहीत आणि पंचतारांकित हॉटेलांशिवाय जेवण घेत नाहीत . पण अटलबिहारी वाजपेयी हे नेतृत्वाचे वेगळे रसायन होते . पायाला भिंगरी बांधून त्यांनी कधी जीपने तर कधी रेल्वेने ऐंशीच्या दशकात पक्षविस्तारासाठी  भारत पिंजून काढला . कधी विश्रामगृहात तर कधी कार्यकर्त्याच्या घरी त्यांचा मुक्काम असे .

 पक्ष विस्तारासाठी अटल बिहारी वाजपेयी हे 1982 साली परभणीत आले होते. त्यांची येथील स्टेडीयम मैदानावर मोठी सभा झाली होती. अटलजी परभणीत जेवण करणार नाहीत असे पक्षाच्यावतीने आधीच सांगण्यात  आले होते. परंतू सभेत तब्बल पावणे दोन तास बोलल्यामुळे अटलजींना भूक लागली.

परंतू जेवणाची व्यवस्था केलेली नव्हती . हॉटेलमध्ये जाण्यास नकार देणारया  अटलजींनी एका कार्यकर्त्याने दिलेल्या पोळी व शिऱ्याच्या डब्यावर अटलजींनी रेल्वेत बसून ताव मारला होता. ही एकच आठवण परभणीकरांच्या मनात घर करून राहीली. देशाचा महान नेता येतो आणि केवळ शिरा व पोळीवरच त्याची बोळवण करावी लागते ही खंत देखील परभणीकरांच्या मनात अजूनही सलते आहे.

अटलजी 1982 साली पक्षविस्ताराच्या कार्यक्रमातंर्गत परभणीला आले होते. परळी (जि.बीड) येथून ते मोटारगाडीने परभणीत आले. रात्री उशिरा त्यांची सभा सुरु झाली होती. सभेसाठी सकाळपासूनच हजारो लोक परभणीत आले होते. आधीच सभेला उशिर झालेला होता. त्यात नांदेड येथे दुसरी सभा होणार होती. त्यामुळे त्यांचे भाषण लांबत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. शांताराम बापू करमाळकर यांनी अटलजींच्या कानात उशीर झालाय असे सांगितले . हे ऐकल्यानंतर अटलजींनी मेरा परभणीसे गहेरा नाता है ... असे म्हणून भाषण पुढे चालूच ठेवले. त्यांचे भाषण खूपच प्रभावी झाले होते . 

परळी येथे गोपीनाथ मुंढे यांच्याकडे   दुपारचे जेवण त्यांनी घेतले होते .  रात्रीचे जेवण नांदेड मुक्कामी  ठरले होते.   परभणीत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. परंतू तब्बल पावणे दोन तास भाषण करून अटलजींना जोरात भुक लागली होती. त्यामुळे आता त्यांना काय द्यायचे हा प्रश्न सर्वासमोर उभा राहिला. काही जणांनी त्यांना हॉटेलमध्ये जाण्याचे सुचवून पहिले पण त्यांनी नम्रपणे नकार दिला . तेव्हा त्या काळातील भाजपचे नेते गणपतराव गव्हाणे यांनी स्वताच्या घरी जावून डब्ब्यात पोळी व शिरा आणला. परभणी - नांदेड रेल्वे प्रवासात  पोळीचा  तो  रोल अटलजींनी खाल्ला.  या आठवणींना परभणीतील सेवानिवृत्त शिक्षक विजय जोशी यांनी उजाळा दिला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख