vaishali sahshikant shinde | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

जावली, कोरेगावच्या वहिनीसाहेब ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 जुलै 2017

सातारा जिल्ह्यातील कोरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पत्नी वैशाली शिंदे या समाजकारण, राजकारणात सक्रिय असतात. शशिकांत शिंदे यांची वाटचाल आणि त्यांच्यावर आलेल्या जबाबदारीविषयी त्या सांगत आहेत. 

मी आज आमदारांची पत्नी म्हणून समाजात वावरते. मात्र, तशी मी सामान्य कुटुंबातील. वडील पोलिस खात्यात होते. आई गृहिणी. आई आणि आजोबांना राजकारणाची आवड. त्या दोघांचीही वैचारिक बैठक पक्की होती. मात्र, प्रत्यक्ष राजकारणात आमचा काहीही संबंध नव्हता. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीप्रमाणेच माझेही जगणे सुरू होते. लग्न झाले आणि लग्नानंतर काही वर्षांत आयुष्याला कलाटणीच मिळाली. साहेब माझ्या आयुष्यात आले आणि राजकारण, समाजकारणाने जीवन व्यापून टाकले. 

पुणे शहरात लहानाची मोठी झाले. तसे आमचे गाव सासवड. तरीही शहरी भागातच वावरणे झाले. जावली तालुक्‍यातील हुमगावसारख्या ग्रामीण भागात मी येईन, असे कधी वाटले नव्हते. पण, योग सांगून येत नाही. शशिकांत शिंदेसाहेबांबरोबर योग जुळून आला तो जणू काही माझी नाळ ग्रामीण भागाशी जोडायची होती म्हणूनच. जावळीसारखा छोट्या-छोट्या वाडीवस्त्यांनी दुर्गम डोंगराळ भाग आणि आता कोरेगाव तालुक्‍यातील विकासाच्या वाटेवर असणारा ग्रामीण भाग. या साऱ्या परिसराची मी झाले, ती केवळ साहेबांमुळे. लग्नापूर्वी या साऱ्या गोष्टींपासून मी तशी अलिप्त, दूरच होते. लग्न झाले त्यावेळी साहेबही या निवडणुकीच्या राजकारणात नव्हते. ते माथाडी कामगारांसाठी झटत होते. माथाडी कामगार, त्यांचे प्रश्‍न, त्यांच्या कामातील अडचणी सोडवून कष्टकरी वर्गाला दिलासा देण्याचे काम ते करीत होते. सकाळ उजाडली की वाशीतील आमच्या घरी माणसांचा राबता असायचा. 

अनेकविध प्रश्‍न घेऊन येणारी माणसे, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्‍न, शांतपणे त्यांना ऐकून घेणारे साहेब हे सारे मी रोज पाहात होते. मला हे सारे नवीनच होते. पण, साहेबांची निर्णय घेण्याची प्रक्रिया, प्रसंगी संघर्षाची तयारी आणि कष्टकरी वर्गाच्या सुख-दु:खाशी समरसून झोकून देऊन काम करण्याची वृत्ती हे सारे त्या काळात मी पाहिले. नकळत मी ते शिकत होते. साहेबांकडे येणारी गर्दी वाढतच होती. समस्यांचे स्वरूपही बदलते असायचे. पण, सर्वसामान्य कामगारांना दिलासा देण्याची भूमिका घेऊनच काम करायचे ठरवून साहेब चालले होते. त्यामुळे कामगारांच्या प्रश्‍नासाठी झगडण्याची तयारी ठेवून प्रसंगी मोठी जोखीम पत्करून ते काम करीत होते. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन प्रश्‍न तडीस लावण्याची त्यांची जिद्द माझ्या जगण्याचा दृष्टिकोन बदलत होती. वाशीमधील दिवसांत मला साहेबांमुळे विविध स्तरांतील लोक भेटले. लोकांना भेटता आले. लोकांच्या व्यथा समजून घेता आल्या. त्यांच्या समस्या साहेब मार्गी कशा लावतात, हे पाहात होते. मुंबईशी निगडित काम सुरू असताना साहेबांची पावले गावाकडे वळू लागली. त्यावेळी कल्पनाही नव्हती की पुढील काळात आपल्यालाही गावाकडेच जायचे आहे. साहेबांचे गावाकडील दौरे वाढू लागले. जावली तालुक्‍यातील संपर्क वाढला. ग्रामीण भागावरही ते पकड मिळवीत गेले. 

कोणतेही काम करायेच म्हणजे स्वतःवर विश्‍वास असावा लागतो. साहेबांचा स्वतःवर विश्‍वास आणि कामावर निष्ठा होती. जावळी विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी ते पुढाकार घेऊ लागले. त्यावेळच्या तेथील राजकारणात ते नवखेच होते. पण, हळूहळू त्यांनी लोकसंपर्क वाढविला. लोकांची कामे करण्यासाठी ते जिवाचे रान करू लागले. प्रस्थापित राजकारणी व्यक्तींपेक्षा त्यांच्या कामाची पद्धत वेगळी ठरली. ते धडाडीने पुढे जात राहिले. वाशीवरून मलाही हुमगावला यावे लागले. तिथूनच ग्रामीण भागाची नाळ जोडण्यास सुरवात झाली. शरद पवार साहेबांबरोबर साहेबांची राजकारणाची वाट सुरू झाली. मग, साहेबांची विधानसभेची पहिली निवडणूक झाली. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना, लोकांच्या पाठिंब्यावर काहीही नसताना साहेबांनी पहिला विजय नोंदविला. साहेब आमदार झाले आणि मग खऱ्या अर्थाने माझे सार्वजनिक जीवनातील असणे अधिक ठळक होत गेले. वहिनीसाहेब म्हणूनच लोक मला ओळखायला लागले. साहेबांचा व्याप दिवसेंदिवस वाढू लागला होता. मुंबईपासून मतदारसंघातील छोट्या-छोट्या गावांपर्यंत वाडी-वस्तीपर्यंत त्यांचा संचार वाढला. कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळू शकत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला सतत कार्यकर्त्यांचे मोहोळ. नडले, अडलेले लोक त्यांचे प्रश्‍न घेऊन आलेले. साहेबांच्या अनुपस्थितीत या साऱ्याकडे मला लक्ष देणे भाग पडू लागले. 

हे सारे समजून घ्यायला मला थोडा वेळ लागला. माझा ग्रामीण भागातील जनतेशी संपर्क वाढू लागला. हे काम करतानाही महिला भेटू लागल्या. महिलांचे प्रश्‍न, त्यांच्या माध्यमातून समोर येणाऱ्या ग्रामीण भागातील समस्या समजू लागल्या. त्या सोडविण्यासाठी खटपट सुरू झाली. महिलांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू झाले. साहेबांच्या कामाची हातोटी माझ्यासमोर होती. मग महिलांचे मेळावे, बचत गटांची उभारणी सुरू झाली. त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून देणे सुरू झाले. ग्रामीण भागातील महिलांसाठी फॅशन डिझायनिंग, फूड मार्केटिंग अशा व्यवसायांसाठी मदत देण्याची कामे सुरू झाली. गरवारे कंपनीकडून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. महिलांना बारा महिने आर्थिक उत्पन्न मिळत राहिले पाहिजे, यासाठी धडपड सुरू झाली. जावलीनंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही याच पद्धतीने काम सुरू झाले. महिलांमध्ये राहून महिलांसह लोकांची कामे करण्यासाठी साहेबांचे प्रोत्साहन मिळू लागले. साहेबांची मदत होऊ लागली. साहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कामांना गती देणे, समर्थक, कार्यकर्ते आणि लोकांशी त्यांचे असणारे नाते टिकवून ठेवणे या कामांबरोबरच महिलांसाठी कार्यरत राहणे, असा माझा दिनक्रम सुरू झाला. नंतर मग साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीत नकळत प्रचाराची जबाबदारीही आली. महिलांच्या साथीने ग्रामीण भागात घरोघरी फिरून ती जबाबदारी मी पार पाडली. 

साहेबांच्या या व्यस्त दिनक्रमात घरासाठी ते वेळ देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तेजस आणि साहिल ही दोन्ही मुले समजून घेतात. आई-वडिलांचे समाजासाठी, लोकांसाठी चाललेले काम आहे. त्यामुळे आपणही जबाबदारीने वागले पाहिजे, अशी मुले सांगतात त्यावेळी आम्हालाही भरून येते. कुटुंबांतील हा समंजसपणा आमची ताकद वाढवत असतो. साहेबही आपल्या दिनक्रमात व्यस्त असले आणि सतत व्यग्र असले तरी त्यांच्या मनातही कुटुंबातील सदस्यांविषयीची काळजी नेहमीच असते. शेवटी तो माणूस आहे आणि त्यांच्यातील माणूस मी जवळून अनुभवते आहे. एवढ्या धडाडीतही त्यांची संवेदनशीलता जागी असते. म्हणून तर ते लोकांसाठी एवढा वेळ देतात. त्याची जाणीव त्यांच्या मनात सतत असते. म्हणूनच कुटुंबीयांसाठीही ते सवड काढतात. वर्षातून एकदा तरी आम्हाला ते फिरायला घेऊन जातात. त्यावेळी आम्ही सारे फक्त आमचे असतो, एकमेकांसाठी असतो. 

साहेबांचा पुढील प्रवास निश्‍चितपणे उज्ज्वल असणार आहे. आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. पक्षातील मोठी पदे त्यांना मिळाली. टीव्हीवरील विविध चॅनेलच्या चर्चेत पक्षाचे प्रवक्ते म्हणून ते सहभागी होत असतात. चर्चेत सारे मुद्दे ते ठामपणे मांडत असतात. पण, एखाद्या मुद्याविषयी त्यांचे मत मला पटले नाही, तर ते माझे मतही समजून घेतात. राजकारणातही त्यांचे तसेच आहे. सर्वांना समजावून घेत पुढे जाण्याचा मार्ग ते नेहमीच पसंत करतात. त्यामुळेच मला खात्री आहे, की पुढील काळातही राजकारणात ते यशस्वी होत राहतील, पुढे जात राहतील. कोणत्या ना कोणत्या पदाची जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने पेलून लोकांच्या जगण्यातील कमतरता दूर करत राहतील. मतदारसंघातील प्रश्‍न मार्गी लावतील. विकासकामे आणि सर्वसामान्यांना सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी ते चालत राहतील. त्यांच्या वाटचालीत पूरक अशी माझी साथ द्यायचे मी लग्न झाले तेव्हाच निश्‍चित केले आहे. 

एखाद्या गृहिणीला आपले कुटुंब सांभाळताना तिच्यापुढे वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी व प्रश्‍न असतात. राजकीय व्यक्तीशी संसार करताना तर फार मोठ्या जबाबदाऱ्या पेलत वाटचाल करावी लागते. कुटुंब, कटुंबाचे राहणीमान, तुमचे निर्णय याला महत्त्व असते. कामगार क्षेत्रापासून सुरू झालेली वाटचाल राज्याचे मंत्री ते महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते अशी साहेबांची चढती कमान वाढत गेली, त्यावेळी कुटुंबातील जबाबदारीही वाढली. मुलांचे शिक्षम, उद्योगव्यवसाय अशा बाबींची जबाबदारी मलाच पेलावी लागली. साहेबांच्या पतसंस्था, सहकारी संस्था, त्यांनी सुरू केलेल कॉलेज अशा संस्थांमध्ये शिस्तबद्ध वातावरण टिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. या सगळ्यांतून शिकायला मिळाले, याचा आनंद वाटतो. प्रचाराच्या काळात एका गावात गेले असताना एका आजोबांनी मला जवळ बोलावले. ते मला म्हणाले, ""मुली, तुझ्या साहेबाला बघितलं की मला यशवंतरावांची आठवण येते.'' आजोबांच्या या शब्दांनी क्षणभर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो क्षण म्हणजे आयुष्यात आपण सगळे काही जिंकले, असाच ठरला. 

संबंधित लेख