Vaijayanti Khaire Started Campaigning | Sarkarnama

'बाबा लक्षात ठेवा धनुष्यबाण'....वैजयंती खैरे लागल्या प्रचाराला 

जगदीश पानसरे 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

शिवसेना पदाधिकारी ते नेते पदाच्या खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रदीर्घ यशस्वी राजकीय प्रवासाचे गमक म्हणजे त्यांचा सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क असे बोलले जाते. अगदी त्यांचे राजकीय विरोधकही हे मान्य करतात. अगदी सुख-दुःखाचे प्रसंग असो की घरातील छोटा-मोठा कौटुंबिक सोहळा त्याला स्वःत चंद्रकांत खैरे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी तरी हजेरी लावणार हे ठरलेले. यातील बहुतांश जबाबदारी त्यांच्या पत्नी आणि शिवसेना महिला आघाडीत सक्रीय असलेल्या वैजयंती खैरे नेटाने पार पाडतात. 

औरंगाबाद : आमदार, मंत्री आणि सलग चारवेळा खासदार राहिलेले औरंगाबाद लोकसभेचे खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी वैजयंती खैरे या देखील मैदानात उतरल्या आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिला, वयोवृध्दांच्या भेटीगाठी घेत त्यांनी दिवाळीपासूनच जनंसपर्क वाढवत प्रचाराचा धडका सुरू केला आहे. "बाबा लक्षात ठेवा धनुष्यबाण", म्हणत वैजयंती खैरे ग्रामीण भाग पिंजून काढतांना दिसत आहेत. 

शिवसेना पदाधिकारी ते नेते पदाच्या खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रदीर्घ यशस्वी राजकीय प्रवासाचे गमक म्हणजे त्यांचा सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क असे बोलले जाते. अगदी त्यांचे राजकीय विरोधकही हे मान्य करतात. अगदी सुख-दुःखाचे प्रसंग असो की घरातील छोटा-मोठा कौटुंबिक सोहळा त्याला स्वःत चंद्रकांत खैरे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी तरी हजेरी लावणार हे ठरलेले. यातील बहुतांश जबाबदारी त्यांच्या पत्नी आणि शिवसेना महिला आघाडीत सक्रीय असलेल्या वैजयंती खैरे नेटाने पार पाडतात. 

दोन विधानसभा आणि चार लोकसभा निवडणुकीतील विजयात शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांचा जसा सिंहाचा वाटा आहे तसा वैजयंती खैरे यांचा देखील त्यात खारीचा वाटा असल्याचे बोलले जाते. आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या असतांना आता स्वःत खासदार खैरे यांनी प्रत्येक मतदारांशी थेट संपर्क साधने सुरू केले आहे. 

सकाळपासून रात्री उशीरापर्यंत फिरून देखील कधी कधी ठरवलेल्या भेटीगाठी होत नाहीत. त्यातच नेतेपदामुळे इतर जबादाऱ्या देखील वाढल्या. अशावेळी पतीची होणारी धावपळ आणि घालमेल पाहून वैजयंती खैरे यांनी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात जाऊन विशेषता महिलांच्या भेटीगाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर आतापासूनच भर द्यायला सुरूवात केल्याचे दिसून येते. 

सकाळपासूनच सुरू होतो दौरा..
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांनाच पाचव्यांदा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. येणारी लोकसभा शिवसेना-भाजप एकत्रित लढणार की स्वतंत्र हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी चालवली आहे. अशावेळी कुठलीही जोखीम न स्वीकारता स्वतः खैरे आणि त्यांच्या पत्नी वैजयंती यांनी थेट जनसंपर्कला प्राधान्य दिले आहे. 

दिवाळी होताच वैजयंती खैरे यांनी ग्रामीण भागातील दौऱ्याची आखणी करत प्रचाराला सुरूवात केली. महिला आघाडीच्या सात ते आठ पदाधिकारी आणि घरच्या जेवणाचा डबा सोबत घेऊन सकाळी नऊ वाजता दौऱ्याला सुरूवात होते. मग ज्या तालुक्‍यातील गावांमध्ये त्या जातात तेथील स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटीगाठी आणि चर्चेला सुरूवात होते. गावातील महिला बचतगट, महिला ग्रामपंचायत सदस्या, अंगवाडी सेविका, वयोवृध्द महिला, पुरूषांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यातून समोर आलेले प्रश्‍न खासदार खैरे यांच्याकडे पाठपुरावा करून ते सोडवण्याची जबाबदारी देखील वैजयंती खैरे घेतात. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्‍यात त्यांचा हा दौरा होतोच. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेला दौरा रात्री दहा-अकरा वाजता संपतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी हाच दिनक्रम. त्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या बरोबरीने त्यांच्या पत्नी देखील निवडणुक प्रचाराला लागल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. 

संबंधित लेख