vaduj agitation | Sarkarnama

जयकुमार गोरे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटलांच्या गाड्या खटावकर अडविणार ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

खटाव तालुक्याला स्वतंत्र आमदार नाही. खटाव तालुका माण, कोरेगाव, कराड उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघात विभागला आहे. काँग्रेसचे जयकुमार गोरे माणचे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे कोरेगावचे तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील कराड उत्तरचे प्रतिनिधित्व करत आहेत.

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍याचा दुष्काळग्रस्त यादीत शासनाने अद्यापही समावेश न केल्याने तालुकावासियांत नाराजी असून तालुक्‍यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ऐन दिवाळीत वडुज येथील तहसिलदार कार्यालयासमोर आज खर्डा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली. या वेळी तालुकावासियांच्यावतीने प्रशासनाला कुसळांची दिवाळी भेट देण्यात आली. 

तालुक्‍याला दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा विषय संपूर्ण जिल्हाभर गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. तालुक्‍यावर ओढवलेल्या या परिस्थितीत खासदार उदयनराजे भोसले यांनी काल (सोमवारी ता. 5) तर आज माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट देऊन आंदोलनात सक्रीय पाठींबा दर्शविला. तर तालुक्‍याला लाभलेले तीन आमदार लोकप्रतिनीधी मात्र तालुकावासियांच्या या आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे केवळ मतांसाठी दारात येणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींच्या गाड्या आता गावच्या वेशीवरच आडवाव्या लागतील, असा इशारा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी दिला. 

येथील अभेद सामाजिक संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटना, शहाजीराजे मित्र मंडळ, खटाव तालुका सोशल फाऊंडेन आदी संस्थांच्यावतीने हे आंदोलन पुकारण्यात आले होते.

आंदोलनात माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,  प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, नंदकुमार मोरे, संदिप मांडवे, सी.एम. पाटील, प्रा. बंडा गोडसे, विजय शिंदे, शहाजीराजे गोडसे, नाना पुजारी, अनिल पवार, तानाजी देशमुख, डॉ. महेश गुरव, अंकुश दबडे, नगराध्यक्ष विपूल गोडसे, सचिन माळी, संदिप गोडसे, दिलीप डोईफोडे, महंमदशरीफ आत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. डोक्‍यांवर भाकऱ्यांची चवड बांधलेली गाठोडी, व प्रशासनाला दिवाळीची भेट देण्यासाठी आणलेली कुसळांची पेटी घेऊन हा मोर्चा तहसिलदार कार्यालयात आला.  

संबंधित लेख