आठवा आई-बापांचे कष्ट, लागा झपाटून कामाला...! 

आठवा आई-बापांचे कष्ट, लागा झपाटून कामाला...! 
आठवा आई-बापांचे कष्ट, लागा झपाटून कामाला...! 

कोल्हापूर : घरची गरिबी, त्यातच पडलेला 1972 चा दुष्काळ, राब-राब राबणारे आई-वडील, आईचं फाटलेलं फाटकं लुगडं...या साऱ्या गोष्टी मनाला इतक्‍या वेदना
द्यायच्या, की गरिबीच्या बरगड्या मोडून काढण्याचा संकल्प केला. रात्रीचा दिवस केला आणि एक यशस्वी उद्योजक झालो. पोरांनो, आठवा तुमच्या आई-वडिलांचे कष्ट
आणि तुम्हीही लागा झपाटून कामाला. असंख्य संधी तुम्हाला खुणावत आहेत...प्रसिद्ध उद्योजक डॉ. अशोक खाडे संवाद साधत होते आणि केवळ त्यांची यशकथाच
नव्हे तर त्यापलीकडचं माणूसपण काय असतं, याचे विविध पदरही उलगडत होते. 

निमित्त होते, सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ आयोजित डीवायपी ग्रुप प्रस्तुत "ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमांतर्गत सहावे पुष्प त्यांनी
गुंफले. त्या वेळी त्यांनी दिलखुलास संवाद साधताना "जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडेल तेवढे कष्ट' हीच यशाची खरी त्रिसूत्री असल्याचेही सांगितले. मिलिंद
कुलकर्णी (पुणे) यांनी हा संवाद खुलवला. 

डॉ. अशोक खाडे मूळचे सांगलीच्या मातीत घडलेले. त्यातही अस्पृश्‍यतेच्या काळातले त्यांचे बालपण. घरची गरिबी आणि या साऱ्या पार्श्‍वभूमीवर अनेक अपमानांना
सामोरे जावे लागले. मात्र, श्रमगंगेला प्रसन्न करीतच गरिबीवर मात करायची हा निर्धार त्यांनी केला. अनेक टक्केटोणपे खात शिक्षण पूर्ण केले. सोबत भावंडांचीही
साथ मिळाली. "माझगाव डॉक'मध्ये नोकरी मिळाली आणि त्यांच्या करिअरचा प्रारंभ झाला. नोकरीला असतानाच त्यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. तेथे
अनेक गोष्टी शिकता आल्या. जर्मनीहून परत आल्यानंतर आपल्याबरोबर आलेल्या इंजिनिअरचे आणि आपले काम एकच असले तरी त्याचा पगार आपल्या बारा पट
असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी राजीनामा देऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. खरी ठिणगी येथेच पडली आणि उद्योजकतेचे स्वप्न
पेरायला हा माणूस ठामपणे उभा राहिला. "दास ऑफशोअर' ही कंपनी त्यांनी सुरू केली. "माझगाव डॉक'च्या माध्यमातूनच पहिले काम मिळाले ते तब्बल एक कोटी
82 लाखांचे. तिन्ही भावांनी मिळून दिवसाची रात्र केली आणि तीन महिने दहा दिवसांत हे कामही पूर्ण केले. हे पहिले काम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर मग त्यांनी
कधी मागे वळून पाहिलेच नाही. सध्या एक हजारहून अधिक कोटींची उलाढाल. चौदाहून अधिक देशातील अभ्यासक्रमांत त्यांच्या चरित्राचा अभ्यास, मुंबईच्या
गॅझेटमध्ये "दास ऑफशोअर'चा समावेश. साडेतीन हजारांवर कामगार, मुंबईतील पहिला बांद्रा येथील स्काय वॉक बांधण्याचा मान, अनेक पुरस्कारांनी सन्मान,
एमफिल, डॉक्‍टरेट...अशी भली मोठी यादी त्यांच्या नावापुढे बघता बघता जमा झाली. हा सारा प्रवास त्यांनी संवादातून उलगडला; पण साऱ्या प्रवासामागे आईचे कष्ट
आणि गरिबीच्या बरगड्या तोडण्याचे त्यांचे स्वप्न हाच एक प्रमुख प्रेरणामंत्र होता. 

डॉ. खाडे सांगतात, ""कंपनी सुरू केली तेव्हा नाव काय द्यायचे हा प्रश्‍न होता. अखेर दत्ता, अशोक आणि सुरेश अशा आमच्या तीन भावांच्या नावावरून "दास' नाव
सुचले. त्यातही पंढरपूरच्या माउलीचे आम्ही सारे दास त्यामुळेही त्याच नावावर शिक्कामोर्तब केले. ऑफशोअर म्हणजे समुद्रात विहिरी खोदून रॉ डिझेल व पेट्रोल
काढण्यासाठीची यंत्रणा उभारणे. एका बोटीत राहून ही सारी कामे करावी लागतात. या कामात नावलौकिक मिळवल्यानंतर मुंबईतील काही स्काय वॉकही कमीत कमी
कालावधीत आणि अत्युच्च दर्जाचे उभारले. दरम्यानच्या काळात मदर तेरेसा भेटल्या, सिंधूताई सकपाळ भेटल्या. अशा प्रत्येकांकडून मूठ मूठभर ऊर्जा सकारात्मक
घेत गेलो आणि यशाचा एकेक टप्पा पार करत गेलो.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com