हमारा पैगाम मोहब्बत और इन्सानियत है...! 

हमारा पैगाम मोहब्बत और इन्सानियत है...! 
हमारा पैगाम मोहब्बत और इन्सानियत है...! 

कोल्हापूर : धगधगतं जम्मू-काश्‍मीर...कधी, कुठे, कसा, केव्हा दहशतवाद्यांचा हल्ला होईल, याची शाश्‍वती नाही. मग, शाळा तर फार लांबची. डोळ्यांदेखतं आई-वडिलांसह दहा-पंधरा नातेवाइकांना जीवे मारलं गेलं...अजूनही त्या आठवणी ताज्या झाल्या की अंगावर रोमांच उभे राहतात...सरहद संस्थेमुळे आम्ही पुण्यात आलो. तमाम महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं..आम्ही आता शिकून मोठे होत आहोत. कुणी यूपीएससी, कुणी डॉक्‍टर, कुणी इंजिनिअर तर कुणी शिक्षकांची स्वप्नं मनात पेरली आहेत..शिक्षण पूर्ण करताच आम्ही पुन्हा आपापल्या गावात जाणार आहोत. कारण आम्हाला जम्मू-काश्‍मीरमध्ये परिवर्तन घडवायचे आहे आणि "हमारा पैगाम मोहब्बत और इन्सानियत है...!'

जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादाच्या भीतीचे सावट उलगडत आज "सरहद' संस्थेच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि एकूणच राष्ट्रप्रेमाची ऊर्जा साऱ्यांच्याच नसानसांत पेरली. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित, डीवायपी ग्रुप प्रस्तुत "ऊर्जा : संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमांतर्गत तिसऱ्या पुष्पाचे. 

कुणी अडीच वर्षांचा, कुणी आठ तर कुणी बारा वर्षांचा असताना "सरहद' संस्थेत आले. मुला-मुलींसह पहिली बॅच एकशे चौदा जणांची; पण संस्थेने आई-वडिलांसारखी माया दिली. तमाम महाराष्ट्र मागे उभा राहिला, अशी कृतज्ञता व्यक्त करीतच या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी संवादाला प्रारंभ केला. ते म्हणाले, ""जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती सुधारत असतानाच पुन्हा काही शक्तींनी प्रवेश केला आणि अशांतता माजली. आमच्यासारख्या अनेक मुलांना शिकून परिवर्तनासाठी सज्ज व्हायचे आहे; पण तेथील भीतीचे सावट गडद होत असताना "सरहद'सारख्या संस्था पुढे आल्या आणि म्हणूनच एवढ्या अंतराचा पल्ला गाठू शकलो. येत्या काळात जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था आणण्यासाठी आमच्यासारखी युवापिढीच महत्त्वाचे योगदान देऊ शकणार आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, आमची पिढी भारतात शिक्षणासाठी कुठेही जायला तयार आहे. मात्र, कधीही "कराची-लाहोर'ला पसंती देणार नाही. शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे प्रमाणही आता वाढले आहे.'' 

जम्मू-काश्‍मीरच्या प्रश्‍नाकडे बघताना कुठल्याही राजकारणाशिवाय केवळ माणुसकीच्या नजरेतून त्याकडे पाहिले तरच अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न सुटणार आहेत. पंच्याहत्तर टक्के लोक आजही मतदानासाठी बाहेर पडतात म्हणजे त्यांना लोकशाही मान्य आहे आणि भारतच आपला देश आहे, हीच त्यांची मानसिकता आहे. जम्मू-काश्‍मीर भारताचाच अविभाज्य घटक असून जगातल्या कुठल्याही शक्तीमध्ये आम्हाला वेगळे करण्याची ताकद नाही. आमची लढाई तर त्यासाठीच आहे, असेही त्यांनी तितक्‍याच आत्मविश्‍वासाने सांगितले. 

दरम्यान, पहिल्या सत्रात वेगा हेल्मेटचे सर्वेसर्वा दिलीप चांडक यांच्याशी संवाद रंगला. 1985 पासूनच्या आपल्या प्रवासातील विविध पदर त्यांनी उलगडले. सुरवातीला अनेक व्यवसाय केले; पण 1989 ला हेल्मेट निर्मितीत उतरलो. हेल्मेट सक्ती होणार, असे तेव्हापासून फक्त ऐकायलाच मिळते. मात्र, कर्नाटकात एकदा दहा दिवसांची हेल्मेट सक्ती झाली आणि तीच संधी मानून विविध संकल्पना पुढे आणल्या. अनेक अडचणी होत्या; पण नव्या बाजारपेठा निर्माण केल्या आणि हेल्मेटच्या विविध व्हरायटी ग्राहकांसाठी खुल्या केल्या. सुरवातीला दिवसाला वीस हेल्मेटची निर्मिती करायचो. आता दिवसाला बारा हजार हेल्मेटची निर्मिती होते आणि "वेगा' हा ब्रॅंड म्हणून प्रस्थापित करण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. योगेश देशपांडे (पुणे) यांनी हा संवाद अधिक खुलवला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com