uproar shivsena member registration program | Sarkarnama

शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रमातच धक्काबुक्की : तालुकाप्रमुखाचा गोटा हाती घेऊन पाठलाग

नितीन बारवकर
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

शिरूर : निवडणुकीच्या तोंडावर शिरूर शहर व तालुका शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख, विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांसमोर तालुका आणि शहर पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी, बाचाबाची झाली. या वेळी तालुका प्रमुखाला धक्काबुक्की करत शहरातील शिवसैनिकांनी त्यांच्या व उपजिल्हाप्रमुखाच्या हकालपट्टीची मागणी केली. 

शिरूर : निवडणुकीच्या तोंडावर शिरूर शहर व तालुका शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख, विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांसमोर तालुका आणि शहर पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी, बाचाबाची झाली. या वेळी तालुका प्रमुखाला धक्काबुक्की करत शहरातील शिवसैनिकांनी त्यांच्या व उपजिल्हाप्रमुखाच्या हकालपट्टीची मागणी केली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख पोपट शेलार यांच्या उपस्थितीत सोमवारी दिवसभर शिरूर-हवेली मतदारसंघातील विविध गावांत संपर्क दौरा झाल्यानंतर सायंकाळी शिरूर शहरात सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ केला.

हुतात्मा स्तंभाजवळ झालेल्या या कार्यक्रमात पदाधिकारी व शिवसैनिकांतील गटबाजी उफाळून आली. शहर प्रमुख संजय देशमुख यांच्यासह पप्पू गव्हाणे, मयूर थोरात व सुरेश गाडेकर हे उपशहरप्रमुख; तसेच इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. तालुका संघटक कैलास भोसले, शहर संघटक राजेंद्र शिंदे, माजी शहर प्रमुख बलराज मल्लाव यांच्यासह काही पदाधिकारी व शिवसैनिकांनी निमंत्रण नसल्याच्या कारणावरून कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

 
या कार्यक्रमानंतर संपर्कप्रमुख सोनवणे यांनी भोसले व इतरांना बोलावून घेतल्यानंतर आरोप-प्रत्यारोप झाले. तालुकाप्रमुख शेलार यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मोबाईलवरून मेसेज पाठविले. त्यात ठराविक पदाधिकाऱ्यांचीच नावे टाकली, अनेकांची नावे गाळल्याचा आरोप झाल्यानंतर शेलार यांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. शहरातील काही पदाधिकाऱ्यांशी त्यांची बाचाबाची झाली. उपशहरप्रमुख गाडेकर यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली, तेव्हा गाडेकर वीट घेऊन त्यांच्यावर धावून गेल्याने गोंधळ उडाला. सोनवणे यांच्यावर काशीद यांनी खोचक टिप्पणी केल्यानेही गोंधळ उडाल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. 

काशीद-शेलारांच्या हकालपट्टीची मागणी 

खडाजंगीच्या प्रकारानंतर शहरातील सर्व शिवसैनिक एकत्र आले. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आमच्यातील गटबाजी संपल्याचे जाहीर केले. उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद व तालुकाप्रमुख शेलार हेच शहरातील शिवसैनिकांना एकत्र येऊ देत नाहीत, जाणीवपूर्वक फूट पाडतात, दुजाभाव करतात, असा आरोप शहरातील पदाधिकाऱ्यांनी केले. या दोघांचीही पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली. शहर शिवसेनेतील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोचवा, अशी मागणीही शहरातील पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख सोनवणे यांच्याकडे केली. 
 

 
 

टॅग्स

संबंधित लेख