unrest against chairman vishvas patil in gokul | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

'गोकुळ'च्या 13 संचालकांनी बंडाचे निशाण रोवले!

सदानंद पाटील   
बुधवार, 5 डिसेंबर 2018

विश्‍वास पाटील यांना बदलण्याची मागणी संघाच्याच संचालकांनी नेत्यांकडे केली आहे

कोल्हापूर : गेली चार वर्षे गोकुळचे चेअरमन म्हणून कार्यरत असलेल्या विश्‍वास पाटील यांना बदलण्याची मागणी संघाच्याच संचालकांनी नेत्यांकडे केली आहे. मात्र नेतेही या बदलाच्या मागणीला गांभीर्याने घेत नसल्याने संघाच्या 17 पैकी 13 संचालकांनी संघाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा इशारा दिल्याने गोकुळ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

चेअरमन पाटील यांच्या बाजुने 4 संचालक असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी अरुण डोंगळे हे चेअरमन असतानाही अशाचपध्दतीने संचालकांनी बंड केले होते. 

प्रमुख सत्ताकेंद्र बनलेल्या गोकुळ दूध संघात संचालक असणाऱ्या प्रत्येकालाच चेअरमन व्हावे, ही मनोमन इच्छा असते. मात्र अशी इच्छा असून चालत नाही, त्यासाठी संघाचे नेते असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार पी.एन.पाटील यांचा आशिर्वाद असावा लागतो. मात्र हा आशिर्वाद आजपर्यंत फक्‍त ज्येष्ठ संचालकांच्या मागेच राहिला आहे.  

गोकुळ दूध संघाच्या चेअरमन बदलासाठी दीड वर्षे हालचाली सुरु आहेत. गोकुळची मागील निवडणूक झाल्यापासून विश्‍वास पाटील चेअरमन आहेत. गेली साडे तीन ते पाउने चार वर्षे ते या पदावर कार्यरत आहेत. गोकुळ चेअरमन पद हे साधारण दोन ते अडीच वर्षांसाठी दिले जाते. मात्र पाटील यांचे गोकुळचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पी.एन.पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याने अध्यक्ष बदलाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

पाटील यांच्या काळात झालेल्या गोकुळच्या सर्वच सर्वसाधारण सभा वादग्रस्त झाल्या आहेत. सभा हाताळता न आल्यानेच विरोधक आक्रमक झाले, असा सूर संचालकांनी लावला आहे. तसेच पाटील यांनी राजीनामा न दिल्याने इतर संचालकांवर अन्याय होत असल्याची भावनाही नेत्यांकडे व्यक्‍त करण्यात आली आहे. चेअरमन बदलाकडे नेते गांभीर्यान पाहत नसल्याने 17 पैकी 13 संचालकांनी बंडाचे निशाण रोवले आहे. त्यामुळे गोकुळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संचालकांचे बंड यावेळी मात्र चेअरमन बदल केल्याशिवाय थांबणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 

संबंधित लेख