udyanraje vs shivendraraje in satara | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

सातारचे राजे 'कोजागरी'लाच मारामारीवर कां उतरतात?

उमेश बांबरे
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

राड्याचा वर्धापनदिन.

सातारा : कोजागरी पौर्णिमेच्या रात्री साताऱ्यातील दोन राजांच्या कार्यकर्त्यांत आनेवाडी टोलनाक्‍यावरून धुमश्‍चक्री झाली होती. या घटनेला उद्या (मंगळवारी) एक वर्षे पूर्ण होत असतानाच आज जुना मोटारस्टॅण्ड येथील एका देशी दारूच्या दुकानावरून दोन राजे व त्यांचे समर्थक पुन्हा आमने-सामने आले. केवळ पोलिसांनी कडक भुमिका घेतल्याने पुढील अनर्थ टळला. कोजागरी पौर्णिमा दोन्ही राजांसाठी वादाचे निमित्त बनल्याचे चर्चा सध्या साताऱ्यात सुरू आहे. 

गेल्या वर्षी कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री आनेवाडी टोलनाक्‍याच्या व्यवस्थापनावरून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकात धुमश्‍चक्री झाली होती. यावेळी आमदारांच्या सुरूची बंगल्यावर उदयनराजे व त्यांचे समर्थक गेले. त्यावेळी दगडफेकही झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली होती. 

आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन खासदार उदनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांच्याकडे होते. हे व्यवस्थापन महामार्ग प्राधिकरणाने बदलून ते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांकडे देण्यात आले होते. याचा खासदार उदयनराजेंच्या मनात राग होता. त्यामुळे त्यांनी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री आपल्या समर्थकांसह जाऊन टोलनाका ताब्यात घेण्याचा प्रकार केला. यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले. त्यामुळे ते थेट साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थानी आपल्या समर्थकांसह आले. तेथे शिवेंद्रसिंहराजे व त्यांचे समर्थकांत जोरदार धुमश्‍चक्री झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. 

उद्या (मंगळवार) या धुमश्‍चक्रीच्या घटनेला एक वर्षे पूर्ण होत आहे. या घटनेत सहभागी असलेल्या सुमारे शंभर जणांवर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे दाखल केले होते. या घटनेला एक वर्षे पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच आज दुपारी जुना मोटारस्टण्ड परिसरातील एका देशी दारूच्या दुकानावरून दोन राजे आमने-सामने आले. येथे श्री. खुटाळे यांच्या जागेत रविंद्र ढोणे यांचे भाडेतत्वावर देशी दारूचे दुकान आहे. या जागेबाबत या दोघांत न्यायालयात दावा सुरू आहे.  तरीही ही जागा खाली करून देण्यासाठी आज खासदार उदयनराजे भोसले व त्यांचे समर्थक तेथे आले होते. त्यावरून येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. रवींद्र ढोणे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक आहेत. दुकान काढण्यावरून तणावपूर्ण परिस्थिती झाल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना समजली. त्यामुळे ते समर्थकाच्या मदतीसाठी घटनास्थळी आले. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले आमने-सामने आले. पण तोपर्यंत पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी आले. पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊन दोघांनाही समजावून सांगितले. पण दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे राजमाने संतापले व त्यांनी प्रथम शिवेंद्रसिंहराजे यांना त्यांची गाडी तेथून हलवा असे सांगितले.  

त्याचवेळी शिवेंद्रसिंहराजे गाडीतून खाली उतरले व त्यांनी रविंद्र ढोणेंशी चर्चा ही केली. पण राजमाने यांनी पुन्हा त्यांना गाडीत बसा व येथून गाडी हलवा असे सांगितले. मला गाडी चालविता येते प्लिज गाडी येथून हलवा, असे सांगितले. शेवटी राजमाने यांनी गाडीतील आमदार समर्थकांना खाली उतरवून तेथे पोलिस निरिक्षक सारंगकर तसेच पोलिसांना गाडीत बसवून आमदारांना गाडी पुढे नेण्यास सांगितले. तसेच ते खासदार उदयनराजेंकडे गेले. उदयनराजे सुरवातीपासून गाडीतच बसून होते. राजमाने यांनी त्यांना महाराज तुमची ही गाडी जाऊ देत, असे सांगून त्यांच्या गाडीला वाट करून देत ती वळवून खासदार निघून गेले त्यांच्यासोबत पोलिस व्हॅनही गेली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी वाढलेली बघ्याची गर्दी सर्वांना धमकावत कमी केली. यावेळी दारू दुकानासमोर पोलिस व्हॅन व पोलिसांची एक तुकडी बंदोबस्तात ठेवण्यात आली होती. 
 

संबंधित लेख