udyanraje towards bjp | Sarkarnama

"खंडणी'तून सुटण्यासाठी उदयनराजे होणार भाजपवासी !

उमेश बांबरे
शनिवार, 29 एप्रिल 2017

उदयनराजे भाजपमध्ये गेल्यास लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात भाजप असा संघर्ष पहायला मिळेल. येथे कॉंग्रेस व इतर पक्ष कोणाच्या बाजूने जाणार त्यावर येथील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहील.

सातारा : खंडाळा औद्योगिक वसाहतीतील सोना अलाइज कंपनीच्या मालकाला खंडणी मागण्याच्या प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले
यांनी या सर्वांतून सुटका करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाशी हात मिळवणी करण्याची तयारी केली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांची यासंदर्भात चर्चा सुरू
आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे त्यांच्या समर्थकांत राजेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. 

उदयनराजे यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरवात 1991 मध्ये पालिकेच्या निवडणुकीतून झाली. ते प्रथम नगरसेवक झाले. त्यानंतर 1996 ची लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला तरी त्यांना मिळालेल्या मतांमुळे सेनेच्या हिंदूराव नाईक निंबाळकरांचा विजय झाला तर कॉंग्रेसचे प्रतापराव
भोसले पराभूत झाले. 1997 मध्ये उदयनराजेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप शिवसेना युतीने त्यांना लगेचच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष
दिले. 1998 ला कै. अभयसिंहराजे भोसले हे लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या विधानसभेच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक झाली. यामध्ये उदयनराजे व
शिवेंद्रसिंहराजे यांच्यात लढत होऊन उदयनराजे विजयी झाले. त्यानंतर त्यांना महसूल राज्यमंत्री पद मिळाले. 

उदयनराजेंना 1999, 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस व पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते गेली
दोन पंचवार्षिक राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने त्यांना बाजूला ठेवले आहे. त्यामुळे त्यांची अवस्था अधांतरी आहे. 

दरम्यान, महिनाभरापूर्वी समर्थकांसह त्यांच्यावर खंडाळ्यातील सोना अलाईज कंपनीच्या मालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात अटक
टाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणात ते चांगलेच अडचणीत आले आहेत. या अडचणीतून सावरण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी
भाजपच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल. कदाचित नारायण राणेंच्या प्रवेशानंतर त्यांचा प्रवेश होण्याची शक्‍यता आहे. पण या सर्व घडामोडीमुळे उदयनराजेंच्या समर्थकांना दिलासा मिळाला असून आपले राजे पुन्हा राजकीय पटलावर दिसणार म्हणून सर्वजण एकवटले आहेत. 

 

 

संबंधित लेख