udyanraje arrest issue | Sarkarnama

...म्हणूनच उदयनराजेंना झाली नाही अटक! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 जुलै 2017

उदयनराजेंनी पोलिसात स्वत: हून हजर व्हायचे की सर्वोच्च न्यायालयात हजर व्हायचे याबाबत निर्णय घेण्यासाठी खासदार समर्थकांची बैठक आज होणार आहे. या बैठकीनंतरच उदयनराजेंची भुमिका निश्‍चित होईल. 
 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी रात्री अचानक सातारा शहरात येऊन "रोड शो' केला. यादरम्यान, केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, या भितीने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कारवाई केली नाही. पण उदयनराजेंच्या या "रोड शो'च्या निमित्ताने पोलिस प्रशासन आता सर्वांकडूनच टार्गेट होऊ लागले आहे. एकीकडे उदयनराजे साताऱ्यात कधीही बिनधास्तपणे येऊ शकतात तर दुसरीकडे गृह राज्यमंत्र्यांनी घेतलेली कारवाईच्या भूमिकेमुळे सातारा एसपींबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

खासदार उदयनराजे भोसले हे खंडणीतील गुन्ह्यात पोलिसांना हवे आहेत. पण ते साताऱ्यात, पुण्यात, दिल्लीत असूनही त्यांच्यावर अटकेची कारवाई करता आलेली नाही. मध्यंतरी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना कधीही अटक होईल, असे पोलिसांकडून सांगितले जात होते. मात्र तसे घडले नाही. त्यानंतर उदयनराजेंनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. पण तोही फेटाळला गेला. याच दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी उदयनराजेंना कोणत्याही क्षणी अटक करणार, अशी डरकाळी फोडली. पण त्यावरही कोणतीही हालचाल पोलिसांकडून झाली नाही. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदार उदयनराजेंपुढे दोन पर्याय होते. एकतर स्वत: हून पोलिसांपुढे हजर होणे किंवा सर्वोच्च न्यायालयात जाणे. पण त्यांनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून स्वत: हून पोलिसात हजर होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिसही उदयनराजे स्वत:हून येतील या भरवशावर राहिले. प्रत्यक्षात शुक्रवारी रात्री नऊ वाजता उदयनराजे अचानक शहरात आले. त्यांचा समर्थकांसह रोड शोही झाला. या रोड शोनंतर ते शहर पोलिस ठाण्यात येणार, अशी अफवा पसरली. पण ते रात्रभर सातारा शहर परिसरात फिरत राहिले. सकाळी सहा वाजता त्यांनी रात्रीच्या घटनांची माहिती वृत्तपत्र वाचून घेतली आणि थेट पुणे गाठले. या कालावधीत साधा एक पोलिस अधिकारी किंवा कर्मचारीही त्यांच्या या रोड शोच्या जवळही गेला नाही. उलट पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न सातारा शहरात निर्माण होईल, या कारणांनी उदयनराजेंची अटक टाळली. पण टाळलेल्या अटकेमुळे पोलिसच अडचणीत आले आहेत. आता उदयनराजे पुन्हा कधी येऊन सातारा शहर पोलिसांत स्वत: हून हजर होणार याची पोलिस वाट पाहत आहेत. 

 

संबंधित लेख