udyanraje | Sarkarnama

मुख्यमंत्री दखल घेणार की दुर्लक्ष करणार ?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी जिल्ह्यात आहेत. त्यांच्यापर्यंत खासदार उदयनराजेंचा विषय पोचविण्याच्या दृष्टीने त्यांचे समर्थक प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. किमान मुख्यमंत्री पोलिस अधीक्षकांना हा काय प्रकार आहे, हे तरी विचारतील, त्यातून काही तरी निर्णय होईल, अशी अपेक्षा खासदार समर्थकांची आहे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर खासदार समर्थकांच्या आक्रमकतेने प्रशासनाची गोची झाली आहे. 

खासदार समर्थकांनी बुधवारी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेत जिल्हाधिकारी श्‍वेत सिंघल यांना निवेदन दिले. उदयनराजेंचे राजकीय खच्चीकरण करण्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेच आघाडीवर असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. 

विरोधकांकडून उदयनराजेंची जाणीवपूर्वक बदनामी करून त्यांचे वर्चस्व संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातूनच सोना अलायन्स कंपनीच्या माध्यमातून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याबाबत पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे खासदार समर्थकांचा संयम सुटत चालला आहे. खोट्या गुन्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांना अटक झाल्यास मावळे पेटून उठतील. परिणामी जिल्ह्यासह राज्यभर आंदोलने, दंगे, जाळपोळ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलून उदयनराजेंवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत. तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका जाहीर सभेत दोन संपविले आहेत अजून दोन बाकी आहेत, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी रचलेल्या षडयंत्राची जाहीर कबुली दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याची चौकशी करून सत्य उजेडात आणावे. तसेच नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या सभापती रामराजेंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा जिल्हाभर आंदोलने छेडली जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. या निवेदनावर संदीप शिंदे, सुनील काटकर, रवी साळुंखे, बाळासाहेब गोसावी, बाळासाहेब चोरगे, नितीन शिंदे, रणजित माने, पंकज चव्हाण, आदींसह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. 

 

संबंधित लेख