udyanraje | Sarkarnama

नाकाबंदीमुळे उदयनराजे समर्थक अस्वस्थ 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 18 एप्रिल 2017

महाराष्ट्र दिनी पोलिस कल्याण निधीचा कार्यक्रम विविध जिल्ह्यात होणार आहे. गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या या वाहनांच्या तपासणीत या कल्याण निधीच्या पावत्या फाडल्या जात असून यातून मिळणारा निधी हा या कार्यक्रमासाठी खर्च केला जाणार आहे, असेही यातून स्पष्ट झाले आहे. 

सातारा : शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी सुरू केल्याने खासदार उदयनराजे भोसले समर्थक अस्वस्थ झाले आहेत. खंडणी प्रकरणात उदयनराजेंना अटक होणार असल्याने ही नाकाबंदी सुरू असल्याचा अर्थ समर्थकांनी घेतल्याने हा गोंधळ उडाला आहे. 

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दोन दिवस प्रमुख शहरांत येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करून सर्व वाहनांची तपासणी मोहीम राबविण्याची सूचना केली. त्यानुसार सोमवार सकाळपासून पोलिसांनी सातारा शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर नाकाबंदी करून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी सुरू केली. अचानक सर्वच ठिकाणी तपासणी सुरू झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी तीन चार दिवस खासदार उदयनराजेंना खंडणीच्या गुन्ह्यात कधीही अटक होणार असे वृत्त सर्वच वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे याचा प्रभाव असलेल्या काहींनी खासदार उदयनराजेंना अटक होणार म्हणून ही नाकाबंदी केली आहे, असा समज करून घेतला. याची हा हा म्हणता शहरात धडकली, आणि खासदार समर्थक अस्वस्थ झाले. त्यांनी वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी संपर्क करून नेमकी परिस्थिती काय, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही नाकाबंदी नांगरे-पाटील यांच्या सूचनेनुसार
केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खासदार समर्थकांचा जीव भांड्यात पडला. 
 

संबंधित लेख