"समृद्धी महामार्ग'पीडित शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंचा दिलासा

 "समृद्धी महामार्ग'पीडित शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंचा दिलासा

औरंगाबाद : शिवसंपर्क अभियानाअंतर्गत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन समृद्धी मार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असा दिलासा दिला.

ठाकरे यांचे दुपारी बारा वाजता सुभेदारी विश्रामगृहात आगमन झाले. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी सर्वप्रथम संवाद साधला. समृद्धी महामार्गात सुपीक जमिनी जात असलेल्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर आपली कैफियत मांडली.

पाचपट मोबदला दिला तरी आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. मुंबईला जाण्यासाठी दोन महामार्ग असताना तिसऱ्या महामार्गाची गरज काय? असा सवाल करत वेगळा विदर्भ करण्याचा घाट यातून फडणवीस सरकार घालत असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला. तुमच्या भूमिकेवर ठाम राहा शिवसेना सत्तेत असली तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा शब्द उद्धव ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेली पाहणी, कर्जमुक्ती, तूर खरेदी प्रश्‍नावर संवाद साधल्यावर शिवसेनेच्या मंत्री, आमदार, नगरसेवक व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुभेदारी विश्राम गृहात झाली.

शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. मुंबईतील आमदार व महापालिकेतील नगरसेवकांच्या पथकाने कालपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन केलेल्या पाहणीचा अहवाल ते उद्धव ठाकरे यांना बैठकीत देणार आहेत. 
जिल्हानिहाय अहवाल घेणार 
मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा अहवाल संबंधित जिल्ह्यात गेलेले आमदार, नगरसेवक व स्थानिक जिल्हाप्रमुखांचे पथक आपला अहवाल लेखी स्वरुपात उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडणार आहेत. बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या लांबच्या जिल्ह्यातील पाहणी पथकांचा अहवाल स्वीकारून त्यांच्याशी आधी चर्चा केली जाणार आहे. जालना व औरंगाबाद या दोन जिल्ह्यांचा अहवाल शेवटी घेतला जाणार आहे. 
एसी आणि नवी खुर्ची 
कॉंग्रेसच्या नेत्यांचे सोन्याच्या ताटातील जेवण आणि संघर्ष यात्रे दरम्यान एसी गाडीत केलेला प्रवास चांगलाच गाजला. यावरुन राज्यभरातून कॉंग्रेसवर टीकेची झोड उठली होती. आपल्या बाबतीत असे काही घडू नये याची खबरदारी शिवसेनेच्या नेत्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक कुठल्या पंचतारांकित हॉटेलात न घेता ती शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतील बैठक पहिल्यांदाच आणि तीही 40-41 अंश तापमान असताना शासकीय विश्रामगृहात होत आहे. जेवणाच्या हॉलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आल्यामुळे तातडीने या ठिकाणी दोन नवे कोरे एसी लावण्यात आले. तसेच उद्धव ठाकरे यांना बसण्यासाठी चकचकीत नवी खुर्ची देखील मागवण्यात आली होती. तीन तासांच्या बैठकीसाठी लाखभराचा खर्च करण्यात आल्याची चर्चा सुभेदारी परिसरात रंगली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com