शेतकरी आत्महत्या थांबवितो असा शब्द देणारे कोण होते?

शेतकरी आत्महत्या थांबवितो  असा शब्द देणारे कोण होते?

पुणे : नव्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार अशा प्रकरणांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून दूरदर्शनवर गप्पा मारत आहे. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस सरकारच्या मृत्यूचीही आकस्मिक अशी नोंद करावी लागेल. लाखो शेतकऱ्यांचे शाप उत्पात घडविल्याशिवाय राहणार नाहीत,' असा खणखणीत इशारा शिवसेनेने पुन्हा एकदा दिला. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून राज्य सरकारला शेतकरी आत्महत्येवरून चांगलेच धारेवर धरले आहे. जालन्यात नुकतीच दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याकडे लक्ष वेधत शिवसेनेचे पक्षप्रमुखांनी म्हटले आहे, की मुख्यमंत्री स्वतःला तरी गांभीर्याने घेत असतील तर मी तोच देवेंद्र फडणवीस आहे व शब्दाला जागणारा आहे असेल तर त्यांनी दाखवून द्यायला नको का?,' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

गेल्या पाच-पंचवीस वर्षांत शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचा धुरळा हजारदा उडाला आहे व तो उडत असताना तेव्हा विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत होते. याचा त्यांना आता विसर पडला आहे असे टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री म्हणतात, कर्जमाफी शक्‍य नाही. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरेच थांबतील काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कॉंग्रेसचे सरकार घालवा. आम्हाला सत्ता द्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवतो, असा शब्द देणारे कोण होते हो? असा उपरोधिक टोलाही या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. 
जालन्यातील ज्या शेतकरी दांपत्याने आत्महत्या केली त्यामागचे कारण तरी समजून घ्या. रामजीच्या नावावर सहा एकर तर त्यांच्या पत्नीच्या नावावर तीन एकर शेतजमीन आहे. शेतीसाठी त्यांनी बॅंकेकडून साडेतीन लाखांचे कर्ज घेतले होते; परंतु त्याची परतफेड करणे शक्‍य नव्हते. शेतीसाठी पाइपलाइन, ठिबक सिंचन संचासाठी त्यांना आणखी कर्जाची आवश्‍यकता होती, परंतु आधी घेतलेल्या कर्जाची थकबाकी असल्याने बॅंकेकडून पुन्हा कर्ज मिळण्याची शक्‍यता नव्हती हे साधे गणित आहे. मग मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिबक सिंचन, अखंड वीज वगैरे घोषणा केल्या त्या काय शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रांची रोषणाई करण्यासाठी? असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com