नोटबंदी समर्थकांच्या जिभा  शेतकऱ्यांच्या तळतळाटाने झडतील 

नोटबंदी समर्थकांच्या जिभा  शेतकऱ्यांच्या तळतळाटाने झडतील 

मुंबई : जे लोक आजही नोटाबंदीचे समर्थन करीत आहेत त्यांच्या जिभा शेतकऱ्यांच्या तळतळाटाने झडल्याशिवाय राहणार नाहीत असे जोरदार टीकास्त्र शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा सोडले आहे. हे सरकार शेअर बाजारवाल्या मूठभर भांडवलदारांचे बटीक झाले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 

मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव सरकारी पातळीवर सुरू आहे. त्या उत्सवात सामान्य जनता व शेतकरी सामील आहेत काय, याचे खरे उत्तर सरकारच्या प्रवक्‍त्यांनी द्यायला हवे. नोटाबंदीचा झटका सोडला तर तीन वर्षांत नवे काय घडले यावर आम्ही आज बोलू इच्छित नसल्याचे स्पष्ट करत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. मोदी सरकारच्या कामगिरीवर टीका करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वक्तव्यांचा आधार घेतला आहे. 

काही महत्त्वाकांक्षी व भव्य प्रकल्प आधीच्या राजवटीत सुरू झालेच होते. त्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनांचे सोहळे मात्र नव्या दमाने सुरू असल्याचा टोला लगवला आहे. ब्रह्मपुत्रा नदीवरील भूपेन हजारिका ढोला-सादिया पुल, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चेनानी-नाशरी भुयारी मार्ग यांचे उदाहरणही यावेळी दिली आहेत. काश्‍मीर प्रश्नांवरून चिमटे काढत शिवसेनेने सरकारच्या कामगिरीवर म्हटले आहे,की मोदी सरकारचा धाडसी आणि महत्त्वाकांक्षी निर्णय कोणता असेल तर तो नोटाबंदीचा. सरकारला तीन वर्षे झाल्याप्रीत्यर्थ पुन्हा एकदा नोटाबंदीचे गुणगान झाले, पण प्रत्यक्षात स्थिती काय आहे ? नोटाबंदीमुळे उद्योग क्षेत्रात मंदीची सुप्त लाट हेलकावे खात आहे व आयटी क्षेत्रात आतापर्यंत लाखभर लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. 

नोटबंदीमुळे सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याचे सांगत शिवसेनेने म्हटले आहे, की शरद पवार यांनीही तोंड फोडले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. नोटाबंदीला सहा महिने लोटले तरी जिल्हा बॅंकांमधील आठ हजार कोटींपेक्षा जास्त जुन्या नोटांची पडताळणी अद्यापि झालेली नाही. त्यामुळे या चलनासंदर्भात सध्या काहीही निर्णय घेता येणार नाही अशी निर्घृण भूमिका रिझर्व्ह बॅंकेने घेतली आहे. 


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com