उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील जहरी टीकेने कर्जतमध्ये युती तुटणार ? 

उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील जहरी टीकेने कर्जतमध्ये युती तुटणार ? 

कर्जत : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जतच्या जाहीर सभेत भाषणाची सुरवातच मागच्या निवडणुकीत जे थोडक्‍यात गमावले ते यावेळेस पूर्ण मिळवायचे असे म्हणत शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आवाहन केले खरे. दोन्ही कॉंग्रेसला सोडून मित्र भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला . त्यामुळे नाराज झालेल्या स्थानिक भाजपने कर्जत नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करायची नाही असे सूर आळवण्यास सुरवात केली आहे. 

ठाकरेंच्या जाहीर सभेतून काही मिळविण्यापेक्षा बरेच काही गमावल्याचीच चर्चा सुरु झाली आहे . 

कर्जत विधानसभा मतदार संघात मतांची गोळाबेरीज केली तर शिवसेनेचे प्राबल्य आहे. दर वेळेस बंडखोरीमुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव होऊन दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ होतो या म्हणी प्रमाणे राष्ट्रवादीचा उमेदवार अगदी थोडक्‍या मताने का होईना निवडून येतो. त्यामुळे ठाकरे आपल्या भाषणात अशा बंडखोरांना चांगलीच ताकीद देतील तसेच आगामी कर्जत विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांचे नाव चर्चेत आहे असे उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नाव घेतील तथा संकेत देतील अशी अपेक्षा थोरवे समर्थक तसेच शिवसैनिकांना होती . मात्र घडले भलतेच . 

विधानसभेचे काय ते नंतर बघू,पहिले नगरपालिकेवर एक हाती सत्ता आणून भगवा फडकावा असे म्हणत विधानसभा उमेदवाराबाबत भाष्य करण्याचे टाळले. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेच्या मनात काही वेगळा विचार तर नाहीना अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. 

खरे पाहता या मतदार संघातील शिवसेनेचा कट्टर विरोधक म्हणजे राष्ट्रवादी. त्यामुळे राष्ट्रवादीवर हल्ला चढविणे अपेक्षित होते. सिंचन गैरव्यवहार, पेण अर्बन बॅंक प्रकरण आदी मुद्यांना हात घालून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची नामी संधी ठाकरेंना होती पण, त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर तर सोडाच पण राष्ट्रवादी असा साधा नामोच्चर सुद्धा केला नाही अशीच भूमिका कॉंग्रेस च्या बाबतीतही घेतली. 

या उलट मित्र पक्ष असलेल्या भाजपालाच नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नाही. सरदार वल्लभभाई पटेलांच्या उत्तुंग पुतळ्याच्या पाया जवळ जाऊन जरा स्वतःला अनुभवा म्हणजे आपण किती छोटे आहोत हे मोदींना कळेल असे म्हणत राम मंदिराच्या नावाने रचलेल्या विटांचा उपयोग सत्तेच्या पायऱ्या गाठण्यासाठीच भाजपने केला अशी जहरी टीका केली. 

दर वेळेस भाजपाला बरोबर घेऊन लढणाऱ्या शिवसेनेला मोदींवरील टीकेमुळे कर्जत नगर पालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेपासून फारकत घेईल असे वातावरण मात्र नक्कीच निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com