Uddhav Thakre to visit Marathwada area | Sarkarnama

उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री मराठवाडा दौऱ्यावर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

संघर्ष यात्रेवर टिका करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत असे सांगितले होते. भाजपची संवाद मोहिम सुरु होण्याआधीच शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद - कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव आणि तूरीच्या प्रश्‍नावरून काँग्रेससह विरोधकांनी रान उठवेले असतांना आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व त्यांच्या पक्षाचे सर्व मंत्री 6 व 7 मे रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेनेचे मंत्री व आमदार तूर खरेदी, गारपीटीमुळे झालेले नुकसान आदींचा आढावा घेऊन त्याचा अहवाल उध्दव ठाकरे यांना देणार आहेत.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व तूर खरेदीवरुन काँग्रेससह विरोधकांनी राज्यभरात संघर्ष यात्रा काढली आहे. शिवसेनेने देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमुक्तीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी नुकतीच 'वर्षा'वर जाऊन केली होती. संघर्ष यात्रेवर टिका करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत असे सांगितले होते. भाजपची संवाद मोहिम सुरु होण्याआधीच शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार 6 मे रोजी शिवसेनेचे आमदार व मंत्री मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा आढाव घेणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी म्हणेज 7 मे रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधून सायंकाळी मराठवाड्यातून पाहणी करून आलेल्या मंत्री, आमदारांकडून अहवाल घेणार आहेत.

संबंधित लेख