Uddhav Thakre BMC Corporators Money Issue | Sarkarnama

पैशांसाठी नगरसेवक फुटले म्हणणे हा मराठी अस्मितेचा अपमान - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई महापालिकेत सत्ता टिकवण्यासाठी नगरसेवकांच्या पळवा पळवीमुळे राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. उद्धव ठाकरे यांनी नीच राजकारण केले असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता, तर शिवसेनेने पैसे देवून नगरसेवक विकत घेतले असा आरोप भाजपने केला होता. याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर देताना 'मराठी अस्मिते'चा राग पुन्हा आळवला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेत सत्ता टिकवण्यासाठी नगरसेवकांच्या पळवा पळवीमुळे राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. उद्धव ठाकरे यांनी नीच राजकारण केले असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता, तर शिवसेनेने पैसे देवून नगरसेवक विकत घेतले असा आरोप भाजपने केला होता. याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर देताना 'मराठी अस्मिते'चा राग पुन्हा आळवला आहे.

‘मराठी अस्मिते’चे पाईक असलेले नगरसेवक पैशांसाठी फुटले! असा आरोप आता करणे हा एकप्रकारे ज्या मराठी अस्मितेसाठी त्या सहा नगरसेवकांनी निर्णय घेतला त्या मराठी अस्मितेचा अपमान आहे, असा खेद उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात, ''मुंबई महानगरपालिकेतील सहा नगरसेवक एका चांगल्या विचाराने शिवसेनेत आले. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची म्हणजे मराठी माणसाची सत्ता उखडून फेकण्याची भाषा भाजपातील काही महाराष्ट्रद्रोह्यांनी करताच हे नगरसेवक शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटले. मराठी अस्मितेची ठिणगी त्यांच्या मनात धगधगत असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला. आम्ही यास फाटाफूट, तोडफोड किंवा पक्षांतर वगैरे मानायला तयार नाही,''

भाजपवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरे लिहतात, ''सध्या राजकारणात 'बक्कळ' पैसा फक्त एकाच राजकीय पक्षाकडे आहे व त्याच पैशांचा वापर करून शिवसेनेचे पाय खेचण्याचे प्रयोग सुरू आहेत. नोटाबंदीनंतर जनतेच्या जीवनात ‘मंदी’चा फेरा आला असला तरी एकाच पक्षात 'चांदी' आहे व त्यामुळेच मणीपूरपासून गोव्यापर्यंत लोकांनी झिडकारले असतानाही फक्त 'पैसा' हेच हत्यार वापरून सत्ता मिळवली गेली.'' इतकेच कशाला, शिवसेनेने लोकहिताच्या प्रश्नांवर पाठिंबा काढून घेतला तरी सरकार पडणार नाही अशा ज्या बतावण्या केल्या जातात त्या फक्त बक्कळ पैशांच्या जोरावरच ना? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, ''बक्कळ पैशांवर ज्यांचे फुटकळ राजकारण आज सुरू आहे व शिवसेनेसारख्या प्रखर हिंदुत्ववादी, अखंड महाराष्ट्रवादी पक्षाचा ‘काटा’ ज्यांच्या उरात सलतो आहे त्यांनी शिवसेनेला त्रास देण्यासाठी, बदनाम करण्यासाठी बक्कळ तीर सोडले तरी ते त्यांच्यावर उलटतील. शिवसेनेच्या मतांत विभागणी करण्यासाठी मराठी मनात फूट पाडायची व त्याचा लाभ घेऊन विजयाचे घोडे दामटायचे या राजकारणास विटलेल्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. शिवसेनेचे बळ वाढल्याचे दुःख काँग्रेस- राष्ट्रवादीस झाले नाही, पण बक्कळ पैसेवाल्यांना ते झाले यातच सर्व काही आले  तेव्हा खुशाल करा तक्रारी! मराठी अस्मितेचा भगवा झेंडा मुंबईवर अखंड फडकतच राहणार आहे.''

 

संबंधित लेख