Uddhav Thakray Criticism on Government at Nagar Public Meeting | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

लोकांना घरपोच दारू देणारे हे सरकार : उद्धव ठाकरेंची नगरच्या मेळाव्यात टीका

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना संबोधित करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिर्डी मंदिराचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानच्या वतीने ठाकरे कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. साईबाबांचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. या दौऱ्यात ठाकरे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. 

नगर : "लोकांना पाणी हवे आहे पण पाणी कसले मागता, घरपोच दारू देतो, असे सांगणारे हे सरकार आहे. हे असले कसले सरकार? लोकांना जगायचे पडले आहे आणि यांना मुख्यमंत्री व्हायचे पडले आहे," अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर आज टीका केली. इतरांचे हिसकावून न घेता धनगरांना आरक्षण द्या, अशी भूमिकाही ठाकरे यांनी मांडली. 

ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेचा मेळावा पार पडला. रामदास कदम, महापौर सुरेखा कदम, लोकसभेचे इच्छुक उमेदवार घनःश्याम शेलार, माजी आमदार अनिल राठोड आदी यावेळी व्यासपीठावर होते. अमोल पाचपुते, कलावती शेळके, संजय लोंढे, सुभाष कांबळे, नितीन वाकळे, अंकुश ठोकळ, पराग गुंड आदींनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना संबोधित करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिर्डी मंदिराचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानच्या वतीने ठाकरे कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. साईबाबांचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. या दौऱ्यात ठाकरे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. 

मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, "नगरची ओळख काय, तर म्हणे विखे, कर्डिले, छिंदम. ही काय ओळख आहे? शिवसैनिक हीच नगरची खरी ओळख आहे." पांगरमल विषारी दारु प्रकरणी आरोप असलेल्या जिल्हा परिषद सदस्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या भाग्यश्री मोकाटे यांच्यावर मोका लावण्याच्या निर्णयावरही ठाकरे यांनी टीका केली.  तिने खून केला की दरोडा टाकला, असे विचार मी पाहून घेतो कसा मोक्का लावतात, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

राममंदीराबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, "आम्ही राममंदिराची शपथ मोडणार नाही. सरकारने कायदा करुन राममंदीर बांधावे. राम मंदिर हा ही जुमला होता, हे त्यांनी जाहीर करावे." उज्ज्वला गॅस योजनेवरही ठाकरे यांनी यावेळी टीका केली. "उज्ज्वला गॅस नावाचा फुगा आहे.  सबसिडी नावालाच आहे. प्रत्यक्षात जमा होते का, हा प्रश्न आहे. अशा सिलिंडरचे रिकामे फुगे काय कामाचे? ही योजना म्हणजे भुलभुलैया आहे." घराघरांमध्ये जाऊन योजनेचा फुगा फोडा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

शिवसेनेला गर्दी साठी पैसे लागत नाहीत, असे रामदास कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधानांच्या दौऱ्यात साईबाबांच्या झोळीतील पैसा खर्च केला असा आरोपही कदम यांनी यावेळी केला. "महाराष्ट्रातील जनतेने सर्वाना अजमविण्याचा प्रयत्न केला. आता शिवसेनेशिवाय पर्याय नाही.
दुष्काळाने राज्यातील शेतकरी हैराण. आता शिवसेनाच तारणार आहे. जी जबाबदारी टाकाल ती आम्ही समर्थपणे पेलू," असे घनःश्याम शेलार म्हणाले. 

सरकारनामा दिवाळी अंक सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

संबंधित लेख