Uddhav asks Gayakwad to refrain from media talk | Sarkarnama

मीडियाशी बोलू नका खासदार गायकवाडांना उद्धव ठाकरेंची सूचना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मीडियाशी बोलू नका, अशी सूचना ठाकरे यांनी दिल्यामुळेच खासदार गायकवाड यांनी या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिल्याचे समजते. 

मुंबई : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे अडचणीत आलेले रवींद्र गायकवाड यांनी शनिवारी सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना "तो कर्मचारी वेडाच होता,' अशी प्रतिक्रिया दिली. दुपारी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना टाळले. मीडियाशी बोलू नका, अशी सूचना ठाकरे यांनी दिल्यामुळेच खासदार गायकवाड यांनी या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिल्याचे समजते. 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे गायकवाड यांनी स्वत:च माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले होते. त्यानंतर ते चांगलेच वादात अडकले. एअर इंडियापाठोपाठ सर्वच विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी घातली. या बंदीवरून शिवसेनेने लोकसभेत गोंधळ घातला. त्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. गायकवाड यांनी शुक्रवारी लोकसभेत निवेदन केल्यानंतर एअर इंडियाने त्यांच्यावरील बंदी उठवली; मात्र गायकवाड शनिवारी राजधानी एक्‍स्प्रेसने मुंबईत आले.

रेल्वेस्थानकावर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, "एअर इंडियाचा तो कर्मचारी वेडा होता. मी माफी मागणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी शिवसेना भवनात ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र गायकवाड यांचा तोरा कमी झाला. उद्धव यांच्याशी चर्चा करून ते बाहेर आल्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. 

संबंधित लेख