udaynraje and maratha party | Sarkarnama

मराठा पक्ष स्थापनेला उदयनराजेंचा पाठिंबा : सुरेश पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

सातारा : मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापन होणार असून येत्या आठ नोव्हेंबरला रायरेश्‍वरावर शपथ घेऊन पक्षाची घोषणा होईल. यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा आशिर्वाद व पाठिंबा आमच्यासोबत असून दोन हजार युवकांच्या साक्षीने हा सोहळा होईल, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज येथे दिली. 

सातारा : मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापन होणार असून येत्या आठ नोव्हेंबरला रायरेश्‍वरावर शपथ घेऊन पक्षाची घोषणा होईल. यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा आशिर्वाद व पाठिंबा आमच्यासोबत असून दोन हजार युवकांच्या साक्षीने हा सोहळा होईल, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज येथे दिली. 

खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी सुरेश पाटील आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी जलमंदीर या खासदारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, मराठा समाजाचा नवीन पक्ष स्थापन होत आहे. येत्या आठ नोव्हेंबरला रायरेश्‍वर मंदीर येथे शपथ घेऊन पक्ष स्थापनेची घोषणा केली जाईल. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आज आम्ही त्यांची भेट घेतली. मराठा समाजाचा पक्ष होणार नाही तर कोणाचा होणार, मराठा समाजाचा पक्ष होण्याची गरज असून तुम्ही कामाला लागा. माझा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तसेच तुम्हाला मदतही करेन. सामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही झटत राहा, मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्‍वास उदयनराजेंनी आम्हाला दिला आहे. 

पक्ष स्थापनेदिवशी रायरेश्‍वरावर जाण्यासाठी आपत्कालिन व्यवस्था असेल, पोलिस असतील तसेच सर्व परवानग्या घेतल्या आहेत. दोन हजार मराठा समाज युवक आठ नोव्हेंबरला रायरेश्‍वरावर शपथ घेण्यासाठी येणार आहे. हा कार्यक्रम देखणा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मावळ्यांसोबत रायरेश्‍वरावर शपथ घेतली. त्या धर्तीवर हा कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व मराठा समाजाने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, तसेच इतर समाजातील लोकांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. खासदार उदयनराजे भोसले यांना हीआम्ही या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले आहे. पण त्यांचा त्या दिवशी पूर्वनियोजित कार्यक्रम असून दिवाळीनिमित्त ते बहिणींकडे जाणार आहेत, त्यामुळे ते उपस्थित राहू शकणार नाही. 

संबंधित लेख