Udaynaraje will fight on NCP's Ticket Predicts Raju Shetty | Sarkarnama

उदयनराजे राष्ट्रवादीतूनच निवडणुक लढतील : राजू शेट्टींचा अंदाज 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

उदयनराजेंच्या तिकिटाचा प्रश्‍न हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्‍न आहे. तरीही ते राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढतील आणि पक्ष त्यांनाच उमेदवारी देईल - राजू शेट्टी

सातारा : ''उदयनराजेंच्या तिकिटाचा प्रश्‍न हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्‍न आहे. तरीही ते राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढतील आणि पक्ष त्यांनाच उमेदवारी देईल,'' असा अंदाज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी कऱ्हाडात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, सदाभाऊंच्या ऑफरची खिल्ली उडवत तेच दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मागत असताना ते कुठल्या आधाराने ऑफर देतात, याचेच आश्‍चर्य वाटते, असा युक्तीवाद त्यांनी केला. 

खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने कऱ्हाडात आले होते. यावेळी रात्री उशीरा त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. खासदार उदयनराजेंच्या उमेदवारीवरून सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यांच्या तिकिटाबाबत तुम्हाला काय वाटते, असे विचारल्यावर शेट्टी म्हणाले, ''खरे तर तो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. मला वाटते की ते राष्ट्रवादीतूनच निवडणुक लढतील. पक्ष त्यांनाच उमेदवारी देईल, असा माझा अंदाज आहे.''

सदाभाऊंनी उदयनराजेंना रयत क्रांती संघटनेत येण्याची ऑफर दिली आहे, यावर शेट्टी म्हणाले, अशा अनेक ऑफर येत असतात. त्या गांभिर्याने घ्यायच्या नसतात. एक तर ते स्वत: दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मागतात आणि कुठल्या आधाराने उदयनराजेंना ऑफर देत आहेत याचेच मला आश्‍चर्य वाटते. 

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या ऊस परिषदेबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, ''आता अशा अनेक ऊस परिषदा होत आहेत. आज आमची जी कऱ्हाडात छोटीशी सभा झाली त्याच्या निम्म्याने तरी त्यांच्या राज्यपातळीवरील ऊस परिषदेस उपस्थिती नसेल तर त्याबद्दल गांभीर्याने घेण्याची गरज नाही.''
 
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर होणाऱ्या आंदोलनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांवर गुन्हे दाखल होत आहेत, यावर शेट्टी म्हणाले, ''शेतकऱ्यांची मुले गुन्हे दाखल होत आहेत, म्हणून थांबणार नाहीत. जेव्हा जेव्हा कायद्याचा गैरवापर करून शेतकरी चळवळ दडपण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तेव्हा बळीराजाने असे करणाऱ्यांना मातीत घातले आहे, हा इतिहास आहे. गुन्हे दाखल करून ही शेतकऱ्यांची मुले ऐकणार नाहीत. हे सरकार निर्ढावलेले आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे का, यावर शेट्टी म्हणाले, ''इंग्रज बरे होते, ते किमान आंदोलनकांशी सभ्यतेने वागत होते, यापेक्षा आता काय बोलू?"

संबंधित लेख