Udayanraje's Preparations for Dashhera | Sarkarnama

उदयनराजेंची सुरु आहे तयारी सीमोल्लंघनाची

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

बैठकीत सध्या सुरु असलेली विविध विकासकामे, प्रलंबित कामे तसेच आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामाबाबत चर्चा झाली. त्यानंतर युवा कार्यकर्त्यांनी प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन मोठ्या दणक्यात साजरे करण्याचा आग्रह उदयनराजेंकडे केला.

सातारा : "सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आत्ता वेळ आहे सीमोल्लंघनाची, त्याची तयारी करा," अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना दिला. जलमंदिर पॅलेस येथे आज (सोमवार) खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा विकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका तसेच विविध ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. 

बैठकीत सध्या सुरु असलेली विविध विकासकामे, प्रलंबित कामे तसेच आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामाबाबत चर्चा झाली. त्यानंतर युवा कार्यकर्त्यांनी प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन मोठ्या दणक्यात साजरे करण्याचा आग्रह उदयनराजेंकडे केला. गावागावातून मोठ्या संख्येने लोक यावेत असे कार्यक्रम ठेवायला पाहिजेत अशी ही भावना व्यक्त केली.उदयनराजेंनी स्मितहास्य करून ''अहो दरवर्षी मी असतोच तुम्ही या म्हणजे झाले, नाहीतर आमचाच कार्यक्रम कराल,'' अशी टिप्पणी केली. त्यावेळी बैठकीचा हॉल धीर गंभीर झाला.

उदयनराजे म्हणाले, "मला कळतेय तुमच्या सर्वांची घालमेल का सुरु आहे. हो आता माझे इलेकशन आले आहे. जनता माझ्या पाठीशी खंबीर आहे, तुम्हीही रहा म्हणजे झाले. सीमोल्लंघन कार्यक्रमास सर्वांना येता आले पाहिजे, असे नियोजन करा." यावेळी युवा कार्यकर्त्यांनी सीमोल्लंघन सोहळ्याचे शहरात तसेच गावागावात फलक लावण्याचे निश्चित केले.

संबंधित लेख