आम्ही स्टंटमॅन तर तुम्ही स्पाॅटबाॅय का? उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला

Udayanraje-Shivendraraje New
Udayanraje-Shivendraraje New

सातारा : ''सहकारी संस्था काढून कुणालाही आम्ही देशोधडीला लावलेले नाही. त्यामुळे शिवेंद्रराजे...दाढी वाढवून अकलेत वाढ होत नसते. त्यासाठी आडात असावे लागते. तुम्ही कुणाची करंगळी धरून राजकारण करत आहात, हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. आम्हाला लोकप्रतिनिधींची जबाबदारी शिकवू नका, तुमच्या पायरीने रहा,'' असा खरमरीत इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शिवेंद्रसिंहराजेंच्या कालच्या टीकेवर दिला आहे. 

यासंदर्भात आज खासदार उदयनराजे यांनी एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. यामध्ये त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर जोरदार टीका केली आहे. उदयनराजेंनी म्हटले आहे की, 'आम्ही घेतलेल्या कणखर भूमिकेमुळेच प्रशासनान, जिल्हापरिषदेच्या शेती शाळेतील जागेत कृत्रिम तळे काढण्यास सुरवात केली आहे. नाही तर गणेश भक्तांना कण्हेर धरणाच्या खाणीत विसर्जनासाठी जावे लागले असते. जिल्हा परिषदेत सत्ता तुमचीच आहे ना, तेथेही तुम्ही करंगळी धरूनच चालत आहात. त्यांचेच ऐकले जाते हे एकदा जनतेसमोर तुम्ही जाहीर करा, तसेच गांधी मैदानावर तुमच्या संस्थात्मक भ्रष्टाचाराबद्दल कध नाक घासताय, याची घोषणा करा.' 

पत्रकात ते पुढे म्हणतात, 'तुमच्या लाडक्‍या चेतकने जलमंदीराच्या चौथऱ्यावर येऊन पत्राची मागणी केल्याने, आम्ही ते पत्र दिले आहे. पत्राची सुरवात पाणी टंचाई लक्षात घेता अशी आहे. परंतू आमच्या पत्रामुळे तळ्यातील विसर्जनास बंदी घातली नसून उच्च न्यायालयात तुमच्या चमको नगरसेवकांनी सभेत मंजुरीशिवाय तत्कालिन मुख्याधिकारी यांनी प्रतिज्ञापत्र द्यायला भाग पाडले होते. त्यामुळे बंदी घातली होती. याचे आत्मचिंतन करून आमदारांनी आपल्या मर्यादा लक्षात घेऊन बेताल आरोप करावेत.' गणेश भक्तांची आम्ही माफी मागून मंगळवार तळे विसर्जनास खुले होणार असेल तर आम्ही केव्हाही माफी मागण्यास तयार आहोत. तथापि तुम्ही तुमच्या बॅंका व संस्थांतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आणले,त्याबद्दल तुम्ही गांधी मैदानावर तुमचे नाक घासणार का, असा प्रश्‍न उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. 

आमच्या पत्राने मंगळवार तळ्यात विसर्जनास बंदी घातली असेल तर आम्ही दिलेल्या ना-हरकतीच्या पत्राने बंदी उठली पाहिजे. पण तसे जिल्हा प्रशासन करीत नाही. याचा अर्थ आम्ही पत्र दिल्याने बंदी घातलेली नाही. तर उच्च न्यायालयातील तत्कालिन मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे घातली गेली आहे. आमच्यावर दुटप्पी भुमिकेच आरोप करणाऱ्या आमदारांचे अज्ञान आणि बालिशपणा जनतेसमोर उघड झाला आहे. आमदारांनी या पत्राचा अर्थ लावून घेण्याकरिता चांगली शिकवणी लावावी,' असेही उदयनराजेंनी म्हटले आहे. 

अजिंक्‍यतारा कारखान्याचे वेस्टवॉटर कुठे सोडले जाते, आम्ही कधी म्हटले आहे का, असा प्रश्‍न करून उदयनराजेंनी पुढे म्हटले की, 'साउंड सिस्टिमला बंदी असावी, असे आम्ही परखडपणे मांडले पण शेवटचे दोन दिवस साउंड सिस्टिमला परवानगी द्यावी, असे आमदार शिवेंद्रराजे म्हणत आहेत. शिवेंद्रराजेंचे बोलणे म्हणजे ती मागणी आणि आम्ही सामान्य व्यक्तींचे मत मांडले की तो स्टंट होतो. आम्ही स्टंटबाज तर तुम्ही स्पॉटबॉय का, अशा शब्दात उदयनराजेंनी त्यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com