udayanraje vs mozar | Sarkarnama

मनसेचे संदीप मोझर उदयनराजेंविरुद्ध लढणार! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्या संपर्क दौऱ्यामुळे आगामी काळात दोन्ही कॉंग्रेस सोबतच भाजप, शिवसेना आणि मनसेचे उमेदवारही रिंगणात पहायला मिळणार आहे. 

सातारा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्या संपर्क दौऱ्यामुळे आगामी काळात दोन्ही कॉंग्रेस सोबतच भाजप, शिवसेना आणि मनसेचे उमेदवारही रिंगणात पहायला मिळणार आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे नेतृत्व करत आहेत. पण लोकसभेवर निवडून आल्यानंतर खासदार उदयनराजेंचे पक्षाशी फारसे पटलेले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी अजिंक्‍यतारा कारखान्यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उदयनराजेंना बाजूला ठेऊन यापुढे राष्ट्रवादीची वाटचाल होईल, असे सांगण्यात आले आहे. यानंतर प्रत्येक निवडणुकीत उदयनराजेंची राष्ट्रवादीच्या विरोधातच भुमिका राहिली आहे. त्यामुळे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस एकत्र लढल्यास राष्ट्रवादी नवखा उमेदवार मतदारसंघातून देणार आहे. 

खासदार उदयनराजे भाजपच्या माध्यमातून रिंगणात राहण्याची शक्‍यता आहे. या सर्व शक्‍यता गृहित धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी लोकसभा निवडणुक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध माध्यमातून संपर्क मोहिम उघडली आहे. संदीप मोझर हे एकेकाळचे खासदार उदयनराजेंचे कट्टर समर्थक होते. पण मध्यंतरीच्या काळात झालेल्या सत्तासंघर्षात मोझर बंधू हे उदयनराजेंपासून दूर गेले. पण त्यांनी स्वत:चे अस्तित्व अबाधित ठेवत आपला प्रत्येक तालुक्‍यात युवक कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत उठविण्यासाठी संदीप मोझर यांनी आतापासूनच बांधणी सुरू केली आहे. 

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या त्रासाविरोधात त्यांनी मोहिम उघडली आहे. तसेच नेत्र तपासणी शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, मेळावे, संपर्क यात्रा, कर्जमाफी अर्ज भरण्याचे अभियान, विविध विकास कामे पदरमोड करून करणे आदी बाबींच्या माध्यमातून त्यांनी लोकसभा मतदारसंघात आपले नाव मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सर्व घडामोडीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच मनसेचा उमेदवार संदीप मोझर यांच्या माध्यमातून रिंगणात असणार आहे. 

संबंधित लेख