नारळ देऊन मला घरी बसविणार आहात का : उदयनराजेंचा आमदार शिंदेंना सवाल

 नारळ देऊन मला घरी बसविणार आहात का : उदयनराजेंचा आमदार शिंदेंना सवाल

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागल्याने त्यांनी आता चक्क विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच त्यांनी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे स्वागत करताना त्यांनी नारळ मात्र, स्वीकारला नाही. नारळ देऊन मला घरी बसविणार आहात का, असा प्रश्‍न उदयनराजेंनी करताना एकच हश्‍या पिकला. 

गेल्या दोन चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उदयनराजेंच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांपुढे थेट उदयनराजेंच्या पक्ष विरोधी भूमिकांचा पाढा वाचला होता. तसेच कार्यकर्ते व आमदारंना विचारल्याशिवाय त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेणार नाही, असा श्री. पवार यांनी दिला होता. 

या सर्व घडामोडी कळताच उदयनराजेंनीही आपला पवित्रा बदलत मी तिकिटाची काळजी करत नाही, माझ्याकडे सर्व तिकिटे आहेत, अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतु आता मात्र उदयनराजेंनी एक पाऊल मागे घेत सबुरीचा मार्ग अवलंबल्याचे दिसत आहे. त्यांनी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. कोरेगावमधील एका खासगी कार्यक्रमासाठी ते निघाले असताना त्यांनी आमदार शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यात अल्पवेळ चर्चा झाली. पहिल्यांदाच खासदार घरी आल्याने आमदार शिंदे यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. पण या सत्कारातील शालच उदयनराजेंनी स्वीकारली. नारळ घेण्यास नकार दिला. नारळ देऊन मला घरी बसविणार आहात का, असा प्रश्‍न उदयनराजेंनी केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांत एकच हश्‍या पिकला. 

यावेळी उदयनराजे म्हणाले, मला कोणाचा ही विरोध नाही आणि मी कोणाला विरोध करत नाही. मी काम करत राहतो, असे हात जोडून त्यांनी सांगितले. शिवाय जे काय अर्थ अनर्थ घडतायत ते मीडिया मुळे घडतायत हे ही त्यांनी आवर्जून सांगितले. तर आमदार शिदेंनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, काही लोक भाजपचे काम करतात. ही तक्रार पक्षाकडे आली आहे. यावर विचार करावा लागेल, परंतु शरद पवार सांगतील त्या उमेदवाराचे काम करण्याचा आमचा निश्‍चय आहे. नाराज कार्यकर्त्यांना समजविण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगताना त्यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत बोलणे मात्र टाळले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com