udayanraje candidate win and loss | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

उदयनराजेंच्या एक उमेदवार जिंकल्या; दुसऱ्या हरल्या! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या मतमोजणीत चौथ्या फेरी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या (साविआ) अर्चना देशमुख आणि अनिता चोरगे या दोन सदस्या विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी एक हार घालून जल्लोष केला. पण फेरमतमोजणीत अनिता चोरगेंना पराभूत व्हावे लागले. त्यांचा विजयाचा आनंद फारवेळ टिकला नाही. 

सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या मतमोजणीत चौथ्या फेरी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या (साविआ) अर्चना देशमुख आणि अनिता चोरगे या दोन सदस्या विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी एक हार घालून जल्लोष केला. पण फेरमतमोजणीत अनिता चोरगेंना पराभूत व्हावे लागले. त्यांचा विजयाचा आनंद फारवेळ टिकला नाही. 

सुरवातीला जिल्हा परिषदेचा सर्वसाधारण प्रवर्गातील महिला राखीवमधील मतमोजणीत राष्ट्रवादीचे एक मत बाद झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातून साविआच्या दिपाली साळुंखे चिठ्ठीवर पराभूत झाल्या. पण एका मताचा घोळ लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे फेर मतमोजणी होऊन मतांचा कोटा आणि त्यांची किंमत धरून मोजणी झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या दिपाली साळुंखे व अर्चना देशमुख (साविआ) विजयी झाल्या. साविआच्या दुसऱ्या उमेदवार अनिता चोरगेंना मात्र, पराभूत व्हावे लागले. 

सर्वसाधारण प्रवर्गातील महिला राखीव मधील मतमोजणी दरम्यान, नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रशासकिय अधिकाऱ्यांचा अभ्यास कमी पडला आणि त्यातून झालेल्या गोंधळामुळे दोन महिला सदस्यांना विजयी असूनही पराभूत व्हावे लागले. मतमोजणी दरम्यान, पहिल्या तीन पसंतीत आठ महिला विजयी झाल्या. पहिल्या फेरीत संगीता खबाले, सुवर्णा देसाई, सुनीता कदम विजयी झाल्या. तर दुसऱ्या फेरीत उषा गावडे, अर्चना रांजणे, जयश्री फाळके, भारती पोळ विजयी झाल्या. 

तिसऱ्या फेरीत संगीता मस्कर विजयी झाल्या. त्यानंतर चौथ्या फेरीत राष्ट्रवादीच्या दिपाली साळुंखे, साविआच्या अर्चना देशमुख आणि अनिता चोरगे यांच्यात चुरस सुरू होती. अर्चना देशमुख यांना पहिल्या पसंतीची दोनच मते हेती. त्या पराभूत झाल्याचे समजून त्या हताश होऊन निघून गेल्या. पण दुसऱ्या पसंतीत त्यांना पाच मते होती. त्यांची दुसऱ्या पसंतीची मते मोजल्यानंतर त्या विजयी असल्याने लक्षात आले. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील यांनी परत बोलावून घेतले. त्यानंतर दिपाली साळुंखे यांना पाच तर अनिता चोरगे यांना चार मते मिळाली. पण सौ. साळुंखे यांचे एक मत बाद असल्याचे सांगितल्याने त्यांची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. दुसऱ्या पसंतीत दोघींना पाच मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठी व्दारे निवड करण्याचे ठरले. त्यानुसार चिठ्ठी टाकण्यात आली. पण कोणीही चिठ्ठी उचलेनात, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने चिठ्ठी उचलली. ती राष्ट्रवादीच्या दिपाली साळुंखेंची निघाली. त्यामुळे त्या पराभूत ठरविण्यात आल्या. 

मतमोजणी पूर्ण झाल्यावर राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी या हरविलेल्या एका मताचा शोध घेण्याची तयारी करून थेट जिल्हा परिषद गाठली. तेथे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा करून ते थेट नियोजन भवनात आले. त्यांनी या निर्णयावर हरकत घेतली. त्यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र बसून चर्चा केली. त्यावेळी काहींनी अर्चना देशमुख पराभूत होतात, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे सौ. देशमुख यांचा चेहरा पडला. त्या शांतपणे नियोजन भवनात बसल्या होत्या. राष्ट्रवादीच्या हरकतीनुसार निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणीचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व महिला उमेदवारांची मतमोजणी केली. यात साविआच्या अनिता चोरगेंना 422, दुसऱ्या उमेदवार अर्चना देशमुख यांना 456 तर राष्ट्रवादीच्या दिपाली साळुंखे यांना 500 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिपाली साळुंखे आणि अर्चना देशमुख यांना विजयी घोषित करण्यात आले. या सर्व प्रक्रियेनंतर अर्चना देशमुख यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. पण सौ. चोरगे यांच्यावतीने अधिकाऱ्यांनी चुकीची मते मोजल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्याचा निर्णय झाला. 

 

संबंधित लेख