रायगडमध्ये होणार राजकीय भूकंप : दोन आमदार भाजपच्या संपर्कात; सेनेलाही धक्क्याचा धोका

रायगडमध्ये होणार राजकीय भूकंप : दोन आमदार भाजपच्या संपर्कात; सेनेलाही धक्क्याचा धोका

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार करणाऱ्या भाजपने आता राज्यात लक्ष केंद्रित केले आहे. रायगडच्या राजकारणात बाहेरचे असूनही यशस्वी ठरत असलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची महत्त्वाकांक्षा उफाळून आली आहे.

जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असलेल्या पालकमंत्र्यांनी दोन विद्यमान आमदार भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे सूचक विधान केले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, नागरिकांत चर्चांना उधाण आले आहे.
 
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपची स्वतःची ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील अनेक नेत्यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू केले असून, जिल्ह्यातील दोन आमदार आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढवण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्या दृष्टीने पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून पक्षवाढीसाठी घेतले जाणारे परिश्रम यामुळे भाजपला रायगड जिल्ह्यात भरते येण्याची शक्‍यता आहे.

रायगडच्या राजकारणात आजवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष हे प्रमुख पक्ष मानले जातात; मात्र गेल्या दोन वर्षांत रायगडच्या राजकारणात भाजपचा झालेला चंचूप्रवेश अनेक पक्षांचे राजकीय अस्तित्व अडचणीत आणणारा ठरत आहे. झपाटल्यागत पक्षाचे काम करणारे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी मागील दोन वर्षांत पालकमंत्र्यांकडून मिळालेली साथ यामुळे तर जिल्ह्यात भाजप आपली स्वतःची ताकद निर्माण करू शकला आहे; मात्र तेवढ्यावर भाजप थांबण्यास तयार नसून भाजप आता जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्ष बनण्याकडे आपली वाटचाल ठेवून आहे. जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी फक्त पनवेल मतदारसंघात भाजपचा आमदार आहे; पण आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा रायगडमध्ये वरचष्मा असावा यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. 

देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्या माध्यमातून सत्तेचा लाभ घेण्यासाठी पेणमधून माजी मंत्री, कॉंग्रेसचे रविशेठ पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. रायगड लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला पेणमध्ये मताधिक्‍यही मिळाले होते; मात्र पनवेल आणि पेण या विधानसभा मतदारसंघांवर अवलंबून न राहता भाजपने सध्या श्रीवर्धन आणि कर्जत या दोन मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. 

ते आमदार नक्की कोण? 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला भरभरून दिल्याने त्याचा फायदा उचलण्यासाठी भाजपची रणनीती असून, आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा भाऊ म्हणून आपली ताकद भाजप उभी करू पाहत आहे. त्यात रायगड आणि मावळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अनेक पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त राहिले होते. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार अपेक्षित आहे. त्याचा फायदा भाजप उचलू पाहत आहे.

त्यासाठी महत्त्वाकांक्षा घेऊन रायगडचे पालकमंत्रिपद घेतलेले रवींद्र चव्हाण यांनी मागील महिनाभर सातत्याने रायगडमध्ये लक्ष घातले आहे. त्यामुळे रायगडमध्ये राजकीय भूकंप घडविण्यासाठी चव्हाण यांचे नियोजन सुरू आहे. या राजकीय भूकंपात केवळ विरोधी पक्ष नाही तर आपला भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतही भूकंप होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. चव्हाण यांनी कशी फिल्डिंग लावली आहे हे सांगता येत नसले तरी दोन आमदार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे सूचकपणे बोलत आहेत. त्यामुळे पालकमंत्री चव्हाण यांच्या राजकीय भूकंपात कोणकोणते पक्ष घायाळ होणार आणि ते दोन आमदार कोण, याबाबत आता रायगडात चर्चा सुरू झाली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com