Two million government employees to go on strike next month | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

19 लाख कर्मचारी जाणार पुढील महिन्यात तीन दिवस संपावर 

संजीव भागवत : सरकारनामा न्यूज ब्युरो 
शुक्रवार, 12 मे 2017

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा करावा, बालसंगोपण रजेच्या संदर्भात मंत्रिमंडळाची मंजुरी द्यावी आदी प्रमुख मागण्या कर्मचारी संघटनेच्या आहेत.

मुंबई  : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणावर सरकारला विरोधीपक्षाने कात्रीत पकडलेले असताना आता सरकारच्या विरोधात सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तीन दिवस संप पुकारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तीन दिवसांचा संप केला जाणार असून त्यात तब्बल 19 लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याने राज्यातील सर्व सरकारी कामकाज तीन दिवस ठप्प होण्याची शक्‍यता आहे.

सरकारने आपल्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य केल्याशिवाय यावेळी संपातून माघार घ्यायचीच नाही, असा पावित्रा कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. हा संप अधिक प्रभावी व्हावा यासाठी राज्यभरात कर्मचारी संघटनांच्या बैठका आणि दौरे सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा करावा, बालसंगोपण रजेच्या संदर्भात मंत्रिमंडळाची मंजुरी द्यावी आदी प्रमुख मागण्या कर्मचारी संघटनेच्या आहेत. याच मागण्यासाठी 12 ते 14 जुलै या तिन दिवसांचा संप पुकारला जाणार असून त्यासाठी राज्यभरातील विविध सरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना आदींशी चर्चा केली जात आहे.

 शुक्रवारी नाशिक येथे यासंदर्भात झालेल्या बैठकीला या विभागातील असंख्य कर्मचारी-अधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवित या संपात उत्स्फुर्तपणे सहभागी होण्यास संमती दिल्याची माहिती कर्मचारी संघटनेकडून देण्यात आली. नाशिकसोबतच औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर, नांदेड, सिंधुदूर्ग, सांगली सातारा आदी ठिकाणीही या संपाच्या संदर्भात बैठका सुरू असून सरकारी कर्मचाऱ्यांसोबत इतर निमसरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनीही या संपाला पाठिंबा दर्शविला असल्याचे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. दरम्यान, या तीन दिवसांच्या संपासंदर्भात अंतिम रूपरेखा लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

संबंधित लेख