tur marthawada | Sarkarnama

अनेक शेतकऱ्यांच्या घरात तुरीच्या पोत्यांची थप्पी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

औरंगाबाद : जाचक अटी, 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी करण्याचा सरकारचा निर्णय यामुळे अनेक शेतकऱ्यांवर "कुणी तूर घेता का तूर' असं म्हणण्याची वेळ आली आहे. तूर खरेदी केंद्रावर पोत्यांच्या थप्या लागल्या आहेत, तशा त्या शेतकऱ्यांच्या घरातही पडून आहेत. पैठण तालुक्‍यातील डोणगावच्या शंभर शेतकऱ्यांच्या घरात 300 क्विंटल पेक्षा अधिक तूर पडून आहे.

औरंगाबाद : जाचक अटी, 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी करण्याचा सरकारचा निर्णय यामुळे अनेक शेतकऱ्यांवर "कुणी तूर घेता का तूर' असं म्हणण्याची वेळ आली आहे. तूर खरेदी केंद्रावर पोत्यांच्या थप्या लागल्या आहेत, तशा त्या शेतकऱ्यांच्या घरातही पडून आहेत. पैठण तालुक्‍यातील डोणगावच्या शंभर शेतकऱ्यांच्या घरात 300 क्विंटल पेक्षा अधिक तूर पडून आहे.

सरकार हमी भावाने खरेदी करायला तयार नाही. तर ज्या तुरीच्या भरवशावर मुलांबाळांचे शिक्षण, लेकींची लग्न करण्याचे स्वप्न पाहिले ते पीक अर्ध्या किंमतीत व्यापाऱ्याला विकावे लागेल अन्यथा सारे काही अवघड होणार आहे. त्यामुळे कात्रीत सापडलेल्या डोणगावच्या शेतकऱ्यांनी सरकारने आमची तूर हमी भावाने विकत घ्यावी अशी मागणी लावून धरली आहे. 

पणनमंत्री शेतकऱ्यांना चिंता करू नको म्हणतात, तर मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर नोंदणी झालेल्याच तुरीची खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. मग शेतकऱ्यांच्या घरात असलेल्या तुरीचे काय? असा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो. हमीपत्र, सातबाऱ्यावरील नोंदी, चौकशा अशा जाचातून वाटचाल करत शेतकऱ्यांची तूर खरेदी सरकारने सुरु केली आहे. पण घरात लागलेल्या थप्पीने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावला आहे. 
शेतकऱ्याला तुरीचे ओझे 
राबराब राबून शेतात पिकवलेले धान्य कधी बाजारात विकतो आणि त्यातून मिळालेल्या पैशातून संसाराचा गाडा हाकतो कधी असं शेतकऱ्याला होतं. पण सध्या घाम गाळून पिकवलेल्या तुरीचे शेतकऱ्याला ओझे झाले आहे. पैठण तालुक्‍यातील डोणगावच्या काही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्य परिस्थीती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माहिती घेतली तेव्हा शंभरावर शेतकऱ्यांच्या घरात 300 क्विंटल तुर पडून आहे.

डोणगावपासून 3 कि.मी. अंतरावर राहणारे ईश्‍वर तांबे यांनी पैठणच्या खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी दोन महिन्यापुर्वी नंबर लावला होता. दर आठ दिवसाला जाऊन ते माझा नंबर कधी येणार अशी विचारणा करत होते. त्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तुम्ही सारख्या चकरा मारू नका, आम्ही तुम्हाला फोन करुन कळवू असे सांगितले. त्यांचा फोन तर आला नाही, पण 22 एप्रिलनंतर सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी बंद केल्याची बातमी येऊन धडकली आणि डोक गरगरायला लागलं.

तुरीच्या पैशावरच बॅंकेच्या कर्जाचे हप्ते, शेतीच्या  मशागतीसाठी बैल जोडी घेण्याचा विचार केला होता. आता खरीपासाठी बियाणे कसे घ्यायचे, मुलीचे शिक्षण कसे करायचे हा मोठा प्रश्‍न आहे. सरकारने तूर खरेदी केली नाही तर आम्हाला ती कवडीमोल भावाने विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया ईश्‍वर तांबे, ज्ञानेश्‍वर, आणि जीजा तांबे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 
आमच्यावर आत्महत्येची वेळ आणू नका 
घरात तुरीची पोती पडून आहेत, सरकार खरेदी करत नसेल तर या तूरीचे आम्ही काय करायचे. दोन हजार रुपये भावाने खाजगी व्यापारी मागत आहेत, पण त्यातून केलेले खर्चही भागत नाही. मग खरीपासाठी बियाणे, मशागतीची कामे, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते कसे भरायचे. या संकटातून आमची सुटका झाली नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. सरकारने आमच्यावर आत्महत्येची वेळ आणू नये अशी भावना डोणगांवचे शेतकरी ईश्‍वर तांबे यांनी व्यक्त केली आहे. 

संबंधित लेख