tur kharedi | Sarkarnama

तूर शेतकऱ्यांची, बाण भाजपचा अन्‌ शिकार राष्ट्रवादीची

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

नगर : पाथर्डीत दोन ट्रक तूर पकडल्यानंतर ही तूर नेमकी कोणाची? व्यापाऱ्यांची की शेतकऱ्यांची, यावर खलबते सुरू आहेत. चौकशी सुरू असली, तरी या मुद्यावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. 

नगर : पाथर्डीत दोन ट्रक तूर पकडल्यानंतर ही तूर नेमकी कोणाची? व्यापाऱ्यांची की शेतकऱ्यांची, यावर खलबते सुरू आहेत. चौकशी सुरू असली, तरी या मुद्यावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. 

ही तूर नेमकी व्यापाऱ्याची की शेतकऱ्यांची, हे चौकशीअंती पुढे येईल, पण त्याआधी पुलाखालून बरेच पाणी गेलेले असेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व बाजार समितीचे संचालक प्रताप ढाकणे यांच्यावर भाजपने सोडलेला बाण किती खोल जातो, यावर या प्रकरणाचे इंगित दडले आहे. पाथर्डी बाजार समिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. भाजप नेत्यांना तूर प्रकरणाचे आयतेच कोलीत सापडल्याने चौकशीसाठी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. या प्रकरणाचा फडशा पाडण्यासाठी यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे तूर प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. 

पाथर्डी बाजार समितीच्या संचालक मंडळाने तूरखरेदीत भ्रष्टाचार केला आहे असा आरोप करून गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी "रास्ता रोको' आंदोलन केले. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर आदींनी आंदोलनात भाग घेतला. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी आंदोलकांनी केली. 

बाजार समितीवर आरोप 
नाफेडचे तूरखरेदी केंद्र तिसगाव येथे बाजार समितीच्या उपबाजारात सुरू होते. येथे शेतकऱ्यांची तूर खरेदी केली नाही. व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली. शासनाचा आलेला बारदाना थेट व्यापाऱ्यांना देण्यात आला. व्यापाऱ्यांची तूर भरून नाफेडच्या गोदामात घेऊन जाताना दोन ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडल्या आहेत. त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी नेत्यांनी केली. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांची तूर न घेता व्यापाऱ्यांची तूर खरेदी करून शेतकऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने अन्याय केला आहे. शेतकरी व शासनाची फसवणूक केली असून, त्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीचे निवेदन भाजपतर्फे जिल्हाधिकारी अभय महाजन यांना देण्यात आले. 

तूर शेतकऱ्यांचीच : शिरसाठ 
बाजार समितीने तिसगाव उपबाजारात शेतकऱ्यांची खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांचे गाळे वापरले आहेत. ते तात्पुरते भाड्याने घेतले होते. शेतकऱ्यांचीच तूर असून, बाजार समितीने कोणताही गैरप्रकार केला नाही, असा खुलासा पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांनी केला आहे. बाजार समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रताप ढाकणे यांचे वर्चस्व आहे. ढाकणे स्वतः बाजार समितीचे संचालक आहेत. प्रारंभी ट्रकमालकांनीच ट्रक पळविल्याची तक्रार ढाकणे करीत होते. सभापती शिरसाठ हे त्यांचेच कार्यकर्ते. 

संबंधित लेख