Tupe , Babar &More are backbone of agitation against Mla Tilekar | Sarkarnama

टिळेकरांविरोधातील आंदोलनाला तुपे, बाबर आणि मोरे यांचा दारुगोळा

ज्ञानेश सावंत
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

या आंदोलनाच्या मालिकेत विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी असली तरी, त्यातील खरेखुरे आंदोलक राष्ट्रवादीचे चेतन तुपे, शिवसेनेचे महादेव बाबर आणि मनसेचे वसंत मोरे हेच आहेत.

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकरांविरोधात गुन्हा दाखल करणारे पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीवरून टिळेकरांच्या विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. गायकवाड यांच्या बदलीचा मुद्दा पुढे करीत, मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनाही रस्त्यावर उतरली. 

या आंदोलनाच्या मालिकेत विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी असली तरी, त्यातील खरेखुरे आंदोलक राष्ट्रवादीचे चेतन तुपे, शिवसेनेचे महादेव बाबर आणि मनसेचे वसंत मोरे हेच आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या तिघांनी टिळेकरांविरोधात आता पुन्हा दंड थोपटण्याचा इरादा केला आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामाआधीच टिळेकरांना नामोहरम  करण्याची विरोधकांची चाल आहे.

आमदार टिळेकरांविरोधात 50 लाख रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाला. तेव्हा, टिळेकरांबाबत फार काही बोलण्यात आले नव्हते. परंतु, टिळेकरांवर कारवाई केल्याने कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड यांची तातडीने बदली झाली. तेव्हा मात्र, भाजप अर्थात, टिळेकरांच्या पारंपरिक विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

गायकवाड यांची बदली रद्द करण्याची मागणी करीत, मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यावर मूकमोर्चा काढला. तेव्हा मोरेंनी शक्तीप्रदर्शन केले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एकत्र येऊन जिल्हधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा बार उडविला. शिवसेनेनेही हाच मुद्दा उचलला आणि निषेध मोर्चा काढला. साहजिकच या तिन्ही आंदोलनाचे नेतृत्व हडपसरमधील इच्छुक म्हणजे, तुपे, बाबर आणि मोरे यांनी आपल्या हाती ठेवले. त्यामुळे गायकवाड यांच्या बदलीवरून हडपसरमध्ये रणधुमाळीला प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे.

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत हडपसरमधून टिळेकर, तुपे, बाबर आणि मोरे हे रिंगणात होते. त्यात टिळेकरांनी बाजी मारली. परंतु, गेल्या काही महिन्यांत टिळेकर यांच्याविरोधात गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यामुळे विरोधी पक्षांना धुमारे फुटले. टिळेकरांचा येवलेवाडीच्या विकास आराखड्यातील (डीपी) हस्तक्षेप, "मर्सिडिस बेंज' आणि आता 50 लाखाची खंडणी, ही प्रकरणे टिळेकर यांच्या विरोधकांच्या पथ्यावर पडली. 

नेमकी संधी साधून विरोधक म्हणजे, तुपे, बाबर आणि मोरे हे टिळेकरांवर तुटून पडले. त्यात आता विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने विरोधकांनी आपापल्या परीने तयारी चालविली आहे. या लढाईत तुपे, बाबर आणि मोरे आघाडीवर आहेत. टिळेकर मात्र, तुर्तास तरी पिछाडीवर आहेत. हडपसरमधील राजकीय अंदाज लक्षात घेता, आगामी निवडणुकीच्या आखाड्यात पक्षीय नव्हे, तर व्यक्तिगत मुद्यांवरूनच धुराळा उडणार हे मात्र, नक्की.

 दरम्यान, राष्ट्रवादीत तुपे यांचे पारडे जड असूनही विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी आपल्याला 'लॉटरी' लागण्याची आशा असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनीही टिळेकरांना चर्चेचे आव्हान दिले आहे. मागील वादाचा दाखल देत, राष्ट्रवादी कॉंग्रसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही टिळेकरांना लक्ष्य केले आहे. "अजित पवारांशी चर्चेची तयारी ठेवणाऱ्या टिळेकरांनी आधी पुणेकरांपुढे यावे,'' असा सल्ला चाकणकर यांनी दिला आहे.

संबंधित लेख