Tukaram Mundhe Rolled Back Tax Hike in Nashik | Sarkarnama

तुकाराम मुंढेंनी नाशिकची करवाढ निम्मी केल्याने अविश्‍वासावर अनिश्‍चिती 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची बुधवारी मंत्रालयात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे आज मुंढे एक पाऊल मागे आले. त्यांनी आज मालमत्तेतील करवाढ निम्मी करण्याची घोषणा केली.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची बुधवारी मंत्रालयात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे आज मुंढे एक पाऊल मागे आले. त्यांनी आज मालमत्तेतील करवाढ निम्मी करण्याची घोषणा केली. यापूर्वी केलेली करवाढ फुगवून सांगत नागरीकांत संभ्रम निर्माण करण्यात आला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आता ही करवाढ मागे घेतल्याने त्यांच्याविरोधातील अविश्‍वास ठरावाविषयी अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. 

मुंढे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली. त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. ते म्हणाले, ''महापालिका करवाढीविषयी वास्तव माहिती न देता गोंधळ निर्माण केला गेला. विशेषतः काही मंडळी सोशल मीडियावर संभ्रम निर्माण करीत आहेत असे स्पष्ट केले. मिळक कराबाबत 1 एप्रिल 2018 नंतर ज्या नवीन इमारती आहेत त्यांना रेटेबल व्हॅल्यू लागू होतो. जुन्या इमारतींना तो नाही. मोकळ्या भूखंडावरील चाळीस पैसे प्रती चौरस फुट कर आता तीन पैसे करण्यात आला. आरसीसी इमारतींचा दोन रुपये कर एक रुपया असा निम्मा झाला. यामध्ये वाढविलेले कर सरासरी पन्नास टक्के कमी झाले. शेतीवर कर नाही. रहिवासी झोनमधील शेतीवर पुर्वीप्रमाणेच तीन पैसे प्रती मीटर हा कर कायम असेल.'' 

या निर्णयाने आपण बॅकफुटवर आलात काय? या प्रश्‍नावर ते म्हणाले, "मी बॅकफुटवर आलो की नाही हे जनतेला ठरवू द्या. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. हा कर नागरीकांना अमान्य असल्यास त्यांना एकवीस दिवसांत त्या विरोधात अपील करता येईल." यामुळे सत्ताधारी पक्षाने दाखल केलेल्या अविश्‍वासातील महत्वाचा आक्षेप काही प्रमाणात निकाली निघाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख