Tukaram Mundhe Opposed Transport Committee | Sarkarnama

जिथे जिथे नगरसेवकांची समिती, तिथे तिथे बससेवा तोट्यात : तुकाराम मुंढे 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

शहरात चारशे बस चालविण्याचा प्रस्ताव बुधवारच्या महासभेत आहे. त्यासाठी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सूचना आहेत. सत्ताधारी भाजपचा बससेवेला विरोध नाही; परंतु त्यातील तरतुदींना विरोध आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये परिवहन समिती आहे. नाशिक महापालिकेतदेखील अशी समिती गठित करण्याची मागणी आहे.

नाशिक : येत्या महासभेत प्रशासनाने महापालिका बससेवेचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. त्या समितीत लोकप्रतिनिधींचा समावेश नाही. त्यामुळे महापौरांनी परिवहन समितीचा आग्रह धरला आहे. त्याला आयुक्त तुकाराम मुंढे स्पष्ट शब्दांत नकार दिला. ''जिथे परिवहन समिती गठित झाली, तेथील बससेवा तोट्यात गेली.'' असे मुंढे यांनी सुनावल्याने भाजपचे पदाधिकारी आता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे हा विषय घेऊन जाणार आहेत. 

शहरात चारशे बस चालविण्याचा प्रस्ताव बुधवारच्या महासभेत आहे. त्यासाठी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सूचना आहेत. सत्ताधारी भाजपचा बससेवेला विरोध नाही; परंतु त्यातील तरतुदींना विरोध आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये परिवहन समिती आहे. नाशिक महापालिकेतदेखील अशी समिती गठित करण्याची मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी आयुक्तांची भेट घेतली. समिती गठीत करण्याचा प्रश्‍न मांडला. त्या बैठकीत परिवहन समिती होणार नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. 

नवी मुंबई, पुणे-पिंपरी येथे परिवहन समिती नाही. त्यामुळे तेथील सेवा सुरळीत आहे. अन्य महापालिकांत परिवहन सेवा समिती आहे. तेथील सेवा तोट्यात आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये परिवहन समिती होणार नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आयुक्त मुंढे यांच्या या निर्णयाने नगरसेवकांत मात्र निराशा पसरली आहे. या विषयावर लवकरच पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला आहे. 

संबंधित लेख