Tukaram Mundhe Nashik Interview | Sarkarnama

विचार, आचरण अन्‌ प्रशासनाचीही सफाई करीन : तुकाराम मुंढे 

संपत देवगिरे 
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

"सफाई फक्त परिसराची होत नाही. विचारांची, आचरणाची देखील असते. त्यासोबत प्रशासनाचीही सफाई मी करीन. रिझल्ट देतील, चांगले काम करतील त्यांना शाबासकी मिळेल. मात्र कामचुकारांची गय नाही. त्यांना शिक्षा मिळेल. हा प्रशासकीय कामाचा भाग आहे.",  असे सांगत नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेशी संबंधीत सगळ्यांनाच 'मेसेज' दिला आहे.

नाशिक : "सफाई फक्त परिसराची होत नाही. विचारांची, आचरणाची देखील असते. त्यासोबत प्रशासनाचीही सफाई मी करीन. रिझल्ट देतील, चांगले काम करतील त्यांना शाबासकी मिळेल. मात्र कामचुकारांची गय नाही. त्यांना शिक्षा मिळेल. हा प्रशासकीय कामाचा भाग आहे.",  असे सांगत नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेशी संबंधीत सगळ्यांनाच 'मेसेज' दिला आहे. आज त्यांनी शहराची ओळख असलेल्या गोदावरी काठाचा चार किलोमीटरचा परिसर अक्षरशः तुटडवुन काढत तिथल्या समस्या समजुन घेतल्या. त्यांच्या या धडाडीपुढे चालतांना, धावतांना अधिकारी, कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली. 

नाशिक शहराची ओळख असलेली गोदावरी, यक्षप्रश्‍न बनलेली तिची स्वच्छता आणि बहुचर्चित गोदापार्कची आयुक्त मुंढे यांनी सकाळी पाहणी केली. यावेळी संबंधीत अधिकारी, कर्मचारी सजग होऊन वेळेत उपस्थित होते. त्यांनी या भागाची माहिती, अडचणी, सुरु असलेली कामे यांची अद्ययावत माहितीही ठेवली होती. रामवाडी पुलापासुन मुंढे यांनी थेट गोदवारी काठावर चालत सर्व त्रुटी, कामे, भुयारी गटारीचे चेंबर्स, नादुरुस्ती या सगळ्यांची माहिती घेत त्यावर काय करायचे याच्या सूचना मुंढे यांनी दिल्या. तेव्हढ्यावर न थांबता त्याची अंमलबजावणी कशी व कधी होईल हे संबंधीतांना विचारले. 

रामवाडी, होळकर पुल, रामकुंड, यशवंत महाराज पटांगण, गाडगे महाराज पुल, नीळकंठेश्‍वर महादेव मंदीर, अमरधाम येथपर्यंत त्यांनी चालत जाऊन पाहणी केली. कर्मचारी, अधिकाऱ्यांची अक्षरशः धावपळ झाली. यावेळी मुंढे यांची गती अनेकांना गाठता आली नाही. ते गाडीत बसतील या अपेक्षेने त्यांचा चालक वाहनाचा दरवाजा उघडुन उभा रहायचा. मात्र, मुंढे गाडीत न बसता चालत पुढे निघायचे.

यावेळी मुंढेशी झालेला संवाद असा -  
प्रश्‍न : अधिकाऱ्यांना काय संदेश दिला आहे?. 
मुंढे : वेळेवर कार्यालयात यावे. उशीर झाल्यास, कामे वेळेत झाली नाहीत किंवा अपेक्षीत रिझल्ट मिळाला नाही तर कारवाई होईल. त्याचेवळी वक्तशीरपणा, चांगले काम करणाऱ्यास शाबासकी मिळेल. 
प्रश्‍न : कार्यालयात सफाईत देवतांच्या तसबीरीही काढण्याच्या सूचना दिल्यात? 
मुंढे : विचार, आचरणातही सफाई अपेक्षीत असते. त्यामुळे महापालिकेचे कामकाज व प्रशासनाची सफाई करु. महापालिका व शहर दोन्हींच्या सफाई व कामांना चालना दिली जाईल. 
प्रश्‍न : गोदावरी पाहणी दौऱ्यात काय सुचना दिल्या?. 
मुंढे : गोदावरी आणि कुंभेमळा ही शहराची ओळख आहे. त्यामुळे गोदावरीच्या सफाईवर विशेष लक्ष देऊ. त्यासाठी संबंधितांना सुचना दिल्या आहेत. त्याची कार्यवाही होईलच. मात्र नागरीकांनीही जे कचऱ्याचे स्पॉट असतील तिथे डस्टबीन मध्येच कचरा टाकावा अशी अपेक्षा आहे. तरच गोदावरी स्वच्छ होण्यास मदत होईल. 
प्रश्‍न : सांडपाणी थेट नदीत मिसळते? 
मुंढे : असे जे नाले असतील त्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार लक्ष दिले जाईल. निधी उपलब्ध केला जोईल. स्मार्ट सिटी प्रकल्पात नागीरकांच्या सुचनांनुसार गोदावरी विकासाचा समावेश आहे. त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याचे काम अपेक्षेनुसार व्हावे याची दक्षता घेतली जाईल. 
प्रश्‍न : नदीपात्रातील शेवाळ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. 
मुंढे : त्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पात विविध यंत्रांच्या खरेदीची शिफारस आहे. त्यावर कार्यवाही होईल. नदी पात्रातील शेवाळ, वनस्पती काढण्यासाठी त्याचा उपयोग होईल. गोदावरी नदीची स्वच्छता होईल हे कटाक्षाने पाहु. जे नागरीक थेट नदीत सांडपाणी सोडतील, त्यावर उपाययोजना करु. त्यासाठी मास्टर प्लॅन तयार आहे. 

संबंधित लेख