Tukaram Mundhe Nashik Corporation GB | Sarkarnama

तुकाराम मुंढेंनी तास घेताच 127 नगरसेवक चिडीचुप्प! 

संपत देवगिरे 
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

शहराची परिवहन सेवेचा विषय गेले काही दिवस चर्चेत आहे. त्यावर महासभा झाली. सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी मुंढे यांच्या विरोधात शब्दशस्त्रे पारजून तयार होते. त्यातील काही बोलले देखील. टीका, टिप्पणीही केली. त्यानंतर आयुक्त मुंढे यांनी माईकचा ताबा घेतला

नाशिक : "पंचवीस वर्षे विकास झाला नाही. गेल्या दहा वर्षात काय काय झाले?. सगळ्यांना तुकाराम मुंढेंच कसा जबाबदार? नगरसेवक बोलतात. माझ्यावर व्यक्तीगत शेरेबाजी करतात. त्यावर खुलासा करण्यासाठीही मला बोलू देत नाहीत. पण लक्षात घ्या बोलायचा जेवढा तुम्हाला अधिकार आहे. तेवढाच मलाही आहे," महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे महासभेत बोलले. त्यांचा तास सुरु होताच सभागृहातील 127 नगरसेवक अक्षरशः चिडीचुप्प झाले. टाचणी पडली तरी आवाज व्हावा एव्हढी शांतता पसरली. 

शहराची परिवहन सेवेचा विषय गेले काही दिवस चर्चेत आहे. त्यावर महासभा झाली. सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी मुंढे यांच्या विरोधात शब्दशस्त्रे पारजून तयार होते. त्यातील काही बोलले देखील. टीका, टिप्पणीही केली. त्यानंतर आयुक्त मुंढे यांनी माईकचा ताबा घेतला. "कालपर्यंत कसे काम झाले? कसा खर्च झाला? हे सगळ्यांना माहित आहे. मी मात्र तसे करणार नाही. कामांची मागणी व निधीची उपलब्धता याचा समतोल पाहून काम करु. डिमांड कराल तर सप्लायचा पर्याय देखील सांगा. प्रकल्प झाले मात्र भूसंपादन केले नाही. त्याचे 350 कोटी द्यायचे आहे. कोर्टाचे आदेश येतात. अवमान याचिका दाखल होतात. त्याचे पैसे द्यायचे की नाही?" असे मुंढे यांनी सुनावायला सुरुवात केली.

''आजवर जे जे झाले त्या सर्वांना तुम्ही मला जबाबदार कसे धरता. तुम्ही माझ्याबाबत वैयक्तीक बोलता. तुम्ही चुकीचे आहात असे नाही. तुमच्या मागण्याही चुकीच्या नाहीत. मात्र कामकाज करतांना प्रशासनाला तारतम्य ठेवावे लागते. तुम्ही माझ्यावर टीका करता. मी मात्र अजिबात कोणाविषयीही बोलत नाही. मात्र मलाही तेव्हढाच बोलण्याचा अधिकार आहे हे लक्षात ठेवा. माझ्यावर टीका करतांना मला का बोलू देत नाही," अशा शब्दात त्यांनी महासभेला उत्तर दिले. 

ते बोलत असताना सभागृहात सर्व 127 नगरसेवक शांत होते. त्यांचा हा तास सुरु असतांना अगदी चिडीचुप्प झाले होते. मुंढे थांबले तेव्हा काही नगरसेवकांनी टाळ्या वाजवुन प्रतिसादही दिला. त्यावर मात्र नेत्यांनी डोळे वटारले. 

संबंधित लेख