तुकाराम मुंढे जिंकले! "पीसीएमसी'चे एक पाऊल मागे !

पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याही सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतल्याने "पीएमपीएमएल'चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याशी असलेला त्यांचा वाद अखेर मिटला आहे.
तुकाराम मुंढे जिंकले! "पीसीएमसी'चे एक पाऊल मागे !
तुकाराम मुंढे जिंकले! "पीसीएमसी'चे एक पाऊल मागे !

पिंपरी : पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याही सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतल्याने "पीएमपीएमएल'चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याशी असलेला त्यांचा वाद अखेर मिटला आहे. 

सोमवारी (ता.3) दोन तास "चाय पे चर्चा' केल्यानंतर गेले दीड महिना सुरू असलेला हा संघर्ष अखेर संपुष्टात आला. त्यामुळे उद्याच्या (ता.5) "स्थायी'च्या बैठकीत "पीएमपीएमएल'ला संचलन तुटीपोटी पिंपरी पालिकेकडून देय असलेली पावणेसहा कोटी रुपयांची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंढे जोपर्यंत पिंपरीत येत नाहीत, तोपर्यंत ही रक्‍कम देणार नाही, यावर पिंपरी पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे अडून बसल्याने या दोघा फायरब्रॅण्ड अधिकारी व पदाधिकाऱ्यांत वाद पेटला होता. मात्र, मुंढे अखेर पिंपरीत आलेच नाहीत. उलट येथील भाजप पदाधिकाऱ्यांना पुण्यात जावे लागल्याने अखेर मुंढेंनी बाजी मारल्याची चर्चा या नाराजीनाट्याच्या समारोपानंतर आता रंगली आहे. दरम्यान, वाईटातून चांगले घडते,या उक्तीनुसार आता उद्योगनगरीच्या अंतर्गत भागात बससेवा (मिडीबस) आणि लेडीज स्पेशल बस लवकरच सुरू होण्याच्या आशा पालवल्या आहेत. 

पुण्यातही सर्वपक्षीयांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. मात्र, पक्षात त्यावरून गटबाजी निर्माण होताच पुण्याच्या महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेते यांनी एक पाऊल मागे घेत मुंढे यांची भेट घेत नुकतीच दिलजमाई केली. तोच कित्ता गिरवीत पिंपरीतही पक्षात मुंढे यांना समर्थन मिळाल्याचे पाहताच शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, पीएमपीएमएलचे संचालक महापौर नितीन काळजे आणि स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे हे पुणे येथील पीएमपीएमएलच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी दोन तास मुंढे यांच्याशी चर्चा केली. आमच्या सर्व मागण्या त्यातही लेडीज स्पेशल व अंतर्गत भागात बससेवा (मिडीबस) मुंढे यांनी तत्त्वतः मान्य केल्याने आमचा विरोध मावळल्याचे सावळे यांनी सांगितले. त्यामुळे गेले महिनाभर चार बैठकांत तहकूब करण्यात आलेला संचलन तूट देण्याचा विषय उद्याच्या बैठकीत मंजूर करणार असल्याचे त्या म्हणाल्या. पिंपरीला भेट देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाहणी करून त्या मार्गी लावण्याचे आश्‍वासन मुढे यांनी दिल्याचे काळजे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com