tripura cm profile | Sarkarnama

बिपलबकुमार देव : संघ स्वयंसेवक ते मुख्यमंत्री व्हावा जिम इन्स्ट्रक्‍टर 

प्रकाश पाटील 
मंगळवार, 6 मार्च 2018

रा.स्वं.संघ आणि भाजपच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या गळ्यात पंतप्रधान मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदाची माळ घातली आहे. त्रिपुरा विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणूून बिपलबकुमार देव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्रिपुराचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान अर्थात देव यांना मिळणार आहे.एक जिम इन्स्ट्रक्‍टर ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 

त्रिपुरा विधिमंडळ भाजपचे नेते म्हणून बिपलबकुमार देव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ते आपल्या समर्थक आमदारांची यादी घेऊन राज्यपालांची भेट घेतील आणि त्यानंतर ते खऱ्या अर्थाने त्रिपुराचे मुख्यमंत्री बनतील. ईशान्येकडील त्रिपुरासारख्या कम्युनिस्टांच्या बाल्लेकिल्ल्याला भगदाड पाडून भाजपने या राज्यात सत्ता खेचून आणली. देशातील साधे मुख्यमंत्री म्हणून माणिक सरकारची ओळख होती. 

माणिक सरकारवर गेल्या काही वर्षापासून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते आणि या सरकारच्या काळात विकास ठप्प झाल्याची टीका भाजप सातत्याने करीत होता. राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सत्तेची चावी अर्थात भाजपच्या हातात दिली आहे. त्रिपुरातील विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे मराठमोळे नेतृत्व सुनील देवधर यांचे नाव जसे घेतले जाते त्यापाठोपाठ बिपलब यांच्या नावाचीही चर्चा होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, जिम इन्स्ट्रक्‍टर ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. 

कोण आहेत बिपलबकुमार ? 
बिपलब यांचा जन्म त्रिपुरातील गोपुती जिल्ह्यातील उदयपूरच्या काक्राबन गावात 1969 मध्ये झाला. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण त्रिपुरातच झाले. येथेच बी.एची पदवी घेतल्यानंतर ते नवी दिल्लीला उच्च शिक्षणासाठी स्थलांतरित झाले. दिल्लीत ते व्यावसायिक जीम इन्स्ट्रक्‍टर म्हणून काम करू लागले. त्यांच्या पत्नीचे नाव नीती देव असून त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. राजधानी दिल्लीत एक दोन नव्हे तर पंधरा वर्षे घालविल्यानंतर ते पुन्हा आपल्या मातृभूमीकडे वळले. मुळातच संघाच्या मुशीत तावूनसुलाखून निघालेला हा स्वयंसेवक शांत बसणे अशक्‍यच होते. त्रिपुरात दाखल होताच त्यांनी राज्यातील मागास जिल्ह्यासाठी आंदोलन सुरू केले. 

त्रिपुरात माणिक सरकारविरोधात जनआंदोलन करतानाच जनतेच्या मनात भाजप रुजविण्यासाठी या कार्यकर्त्यानेही जिवाचे रान केले. भाजपचा एक सक्रिय कार्यकर्ता माणिक सरकारच्या पाडावासाठी रात्रीचा दिवस करीत होता. असे करता करता त्रिपुरा विधानसभेची निवडणूक लागली. सुनील देवधरांच्या खांद्याला खांदा लावून त्रिपुराच्या या भूमिपूत्राने प्रचारात आघाडी घेतली. पक्षाने त्यांना अगरतळातील बानमलिपुरम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. 

निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. या मतदारसंघाचे आमदार होते कॉंग्रेसचे गोपाळ रॉय. रॉय यांच्याबरोबरच त्यांना कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आणि युवा नेते अमोल चक्रवर्ती यांच्याशीही सामना करावा लागला. देव यांनी या दोघांनाही निवडणुकीत अस्मान दाखविले आणि विजयश्री खेचून आणला. 

इकडे देव हे तर विजयी झालेच पण, त्याबरोबर त्रिपुरात भाजपची एकहाती सत्ताही आली. माणिक सरकारचा पाडाव अशक्‍य आहे असे भले भले राजकीय तज्ज्ञ म्हणत होते. त्यांची भविष्यवाणी भाजप कार्यकर्त्यांनी खोटी ठरविली. देव यांनी तर राज्यात प्रचार करताना युवकांची मने जिंकली. तरुणांच्या हाताला काम देण्याचे आश्‍वासन त्यांनी प्रचारादरम्यान दिले होते. युवकांनी त्यांच्यावर विश्वासही व्यक्त केला. त्याला यशही मिळाले. देव यांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्‍वासनही दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देव हे राजकीय गुरू मानतात. 

त्रिपुरातील जाहीरसभाही त्यांनी यशस्वी करून दाखविल्या आहेत. पक्षाच्या आणि संघाच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या गळ्यात पंतप्रधान मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदाची माळ घातली आहे. त्रिपुरा विधिमंडळाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणूून त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्रिपुराचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान अर्थात देव यांना मिळणार आहे.  

संबंधित लेख