Tribal tribes with Vanchit Aaghaadi, says dr dashrath bhande | Sarkarnama

अन्यायग्रस्त आदिवासी जमाती वंचित आघाडीसोबत;  माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांचा दावा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 डिसेंबर 2018

अकोला, अमरावतीसह संपूर्ण राज्यातील अनुसूचित जमातीतील  आदिवासींनी वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी रविवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केला. 

अकोला : अकोला, अमरावतीसह संपूर्ण राज्यातील अनुसूचित जमातीतील  आदिवासींनी वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी रविवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केला. 

वंचित आघाडीचा पुढील मेळावा गुरुवार, 13 डिसेंबर रोजी नागपूर येथे होत आहे.अनुसूचित जमातीतील लोकांच्या प्राथमिक गरज सुद्धा हे सरकार भागवू शकले नाही. उलट या जमातींना आपल्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव राज्य सरकार खेळत आहे. ही बाब लक्षात घेता व येत्या काळात न्याय मिळण्याच्या उद्देशाने भारिप बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार अकोल्यासह राज्यभरातील 45 अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी केला असल्याची माहिती आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दशरथ भांडे यांनी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

ते पुढे म्हणाले, कोळी महादेव, हलबा, माना, गोवारी, मन्नेवार, टोकरे कोळी, ढोर कोळी, अशा अनेक आदिवासी जमाती आदिम काळापासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. अकोला अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल एक कोटी अन्यायग्रस्त आदिवासींची संख्या आहे. त्यातील कोळी महादेव जमातीसह दीड लाख आदिवासी जमातीतील लोक एकट्या अकोला जिल्ह्यात आहे. तसेच वंचित व आदिवासी समाजाचे महाराष्ट्रात 85 मतदारसंघात प्राबल्य, अशी माहिती डॉ. भांडे यांनी यावेळी दिली.

मात्र आजवर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असो किवा विद्यमान भाजप-शिवसेना युतीचे सरकार असो, या दोन्ही राज्यकर्त्यांनी आदिवासी समाजाची फसवणूक केली असल्याचेही डॉ. भांडे यांनी नमूद केले. मराठ्यांना जेवढ्या ताबडतोब आरक्षण दिले तेवढ्यात तत्काळ महाराष्ट्रातील आदिवासींचे प्रश्नही सरकारने सोडवावे, अशी मागणीही डॉ. भांडे यांनी केली. 
 

संबंधित लेख