बदलीसाठी आलेल्या "पाहुण्यां'मुळे मंत्रालयीन कामकाजात अडथळा

बदलीसाठी आलेल्या "पाहुण्यां'मुळे मंत्रालयीन कामकाजात अडथळा

मुंबई : प्रशासन दरबारी मे महिना हा बदलीचाच महिना म्हणून ओळखला जात असल्यामुळे या महिन्यात दरवर्षीच मंत्रालयात शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचीच वर्दळ अधिक असते. यंदा तर बदलीसाठी मंत्रालयात येणाऱ्या पाहूण्यांनी सोबतीला बजरंग दल, आरएसएस, अभाविपचेही पदाधिकारी आणून बदलीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. बदलीसाठी आलेले संबंधित आपल्या अडचणींचा पाढा वाचत कार्यालयात ठिय्या मांडून बसत असल्याने मंत्रालयीन कामकाजात अडथळे निर्माण होवू लागल्याची तक्रार मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सचिव, उपसचिव तसेच कक्षअधिकारी करू लागले आहेत. 

प्रशासनात मे महिन्यातच प्रामुख्याने सर्रासपणे बदल्या होत असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सरकारी कर्मचारी व अधिकारी आपल्या बदलीसाठी मंत्रालयातील संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या दालनात चपला झिजवित असतात.

सरकारी कर्मचारी असल्यामुळे ओळखपत्राच्या आधारावर त्यांना सकाळी वाजताच मंत्रालयात प्रवेश मिळतो. बदल्या प्रामुख्याने सचिवस्तरावरच नियंत्रित होत असल्याने बदलीसाठी आलेले अनेक जण आमदारांच्या चिठ्ठठ्या आणतात, तसेच आपल्या आमदारांला सचिवाना फोनही करावयास लावतात. बदल्यांसाठी अनेक जण आपल्या विभागातील जिल्हा परिषद सदस्यांनाही सोबत आणतात. अन्य दिवसांच्या तुलनेत मंगळवारी कॅबिनेटच्या दिवशी बदलीसाठी आलेल्यांचे प्रमाण लक्षणीय असते. 


सचिव, उपसचिव, कक्षअधिकारी या सर्वांच्या कार्यालयात बदल्यांसाठी कोणी ना कोणी आलेले पहावयास मिळते. बदलीसाठी आलेले घटक आले काम अवघ्या काही मिनिटात संपविण्याऐवजी तास-दोन तास कार्यालयात ठिय्या मांडूनच बसत असल्याने अन्य प्रशासकीय कामांकरिता वेळच मिळत नसल्याची तक्रार मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून नाव न छापण्याच्या अटीवर करण्यात येत आहे.

आघाडी सरकारच्या काळात जिपचे सदस्य, आमदार, खासदार यांचे नाव सांगून बदलीसाठी आलेले घटक आपले काम करण्याचा प्रयत्न करत असत. परंतु भाजपा-सेना सरकारच्या काळात बदलीसाठी आलेले घटक बजरंग दल, आरएसएस, अभाविप या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही सोबत घेवून येत असल्याने मंत्रालयीन अधिकाऱ्यांची कोंडी होवू लागली आहे. सोबत येणारे हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी थेट मंत्र्यांनाच फोन लावून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. मंत्री अन्य कोणाचे नसले तरी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांचे फोन लगेच रिसिव्ह करत असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांकडून देण्यात येत आहे. 

काही मंत्र्यांच्या कार्यालयात तर स्पष्टपणे बाहेर बदल्यांसाठी कोणी भेटू नये असे लिहीलेले असले तरी दोन-चार घटक बदल्यांसाठी ठिय्या मांडून बसलेले पहावयास मिळते. बदल्यांसाठी आलेल्या पाहूण्यांमुळे काम करण्यात अडथळे तर येतातच, परंतु तास-दोन तास त्यांचे म्हणणे ऐकण्यात अथवा त्यांना समजावण्यातच जात असल्याचे मंत्रालयीन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ठराविक कालावधीनंतर बदलीसाठी आग्रह धरणे स्वाभाविक असले तरी अनेक घटक सहा-आठ महिन्यानंतरच बदलीसाठी येत असल्याचे व त्यांचीच संख्या जास्त असल्याचे मंत्रालयीन सूत्रांचे म्हणणे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com